Breaking News

सरदार सरोवर उद्योजकांसाठी; मेधा पाटकर यांचा आरोप

नागपूर, दि. 28, सप्टेंबर - गुजरातमधील नर्मदा नदीवरील उभारलेला सरदार सरोवर हा प्रकल्प उद्योजकांसाठी असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या मेधा  पाटकर यांनी केला. नागपुरातील म्यूर मेमोरीअल रुग्णालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी पाटकर म्हणाल्या की, सरदार  सरोवर प्रकल्प हा केवळ उद्योगपतींसाठी आहे. या प्रकल्पातून कोका-कोला कंपनीला 30 लाख लीटर पाणी दिले जाणार आहे. तसेच नव्याने येऊ घातलेल्या कार  कंपनीसाठी 60 लाख लिटर आणि अदानी-अंबानीसारख्या उद्योगपतींच्या कंपन्यांसाठी पाणी उपलब्ध व्हावे, केवळ यासाठी या धरणाचे पंतप्रधानांनी लोकार्पण  केल्याचा आरोप त्यांनी केला.
केवळ 139 मीटरची भिंत बांधून झाली म्हणजे प्रकल्प पूर्ण झाला असे म्हणता येत नाही. सरदार सरोवर प्रकल्पातील 40 हजार प्रकल्पग्रस्त कुटुंबीयांचे पुनर्वसन  अजून झालेले नाही. गेल्या 31 जुलै पर्यंत त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, असे न्यायालयाचे आदेश होते. पुनर्वसन न करताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकल्पाचे  लोकार्पण केले. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होत नाही आणि त्यांना पर्यायी जमीन उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरुच राहणार असल्याचे  त्यांनी सांगितले. उद्योगपतींना हे पाणी मिळावे आणि येणा-या गुजरातच्या निवडणुका लक्षात घेऊन त्यांनी लोकार्पण केले. त्या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी देशभरातील  मुख्यमंत्र्यांनी निमंत्रित केले होते. परंतु गुजरातचे मुख्यमंत्री सोडले एकाही राज्याचे मुख्यमंत्री सहभागी झाले नसल्याचा दावा त्यांनी केला.
नदी-जोड प्रकल्पांवरही टीका
अमेरिकेसारखे प्रगत देश त्यांच्याकडील मोठमोठी धरणे तोडत आहे. अशा वेळी भारतातील नदी-जोड प्रकल्प सुद्धा फोल ठरेल. नदी-जोड प्रकल्पामुळे सुद्धा सामान्य  नागरिक व शेतकर्‍यांना काहीच फायदा होणार नसून यातही केवळ उद्योजकांनाच लाभ होणार आहे. पद्मविभूषण स्वामी जग्गी महाराज यांनी इशा फाउंडेशनच्या  माध्यमातून 3 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत लुप्तप्राय झालेल्या नद्या वाचवण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर यात्रेचे आयोजन केले आहे. देशातील 16  राज्यातून ही यात्रा होत असून स्वतः जग्गी महाराज वाहन चालवत प्रवास करीत आहेत. तसेच ते नद्यांच्याकाठी वृक्षारोपण देखील करीत आहेत. त्यांची ही यात्रा ढोंग  असून पूर्णपणे प्रायोजित असल्याचा आरोप पाटकर यांनी केला. तसेच जग्गी महाराज हे डेरा सच्चा सौदाच्या रामरहीम यांच्यापेक्षा मोठे फ्रॉड असल्याचे पाटकर  म्हणाल्या. दरम्यान जग्गी महाराज यांच्यावर कशाच्या आधारे आरोप करीत असल्याचे पाटकर यांना विचारले असता त्यांनी कुठलीही माहिती दिली नाही. यासंदर्भात  योग्यवेळी खुलासा करू असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली.