Breaking News

’गोल्डन’ सिताफळाची ग्राहकांना भुरळ

पुणे, दि. 04, सप्टेंबर - सोनेरी रंगाचे, गोड चवीच्या ’गोल्डन’ सिताफळाची ग्राहकांना भुरळ घातली आहे. गोल्डन सिताफळाचा हंगाम नुकताच सुरू झाला आहे.  पुरंदर तालुक्यातील माळशिरस परिसरातून या प्रकारच्या सिताफळाची बाजारात आवक होत आहे. रविवारी सुमारे 500 ते 700 किलो या सिताफळाची आवक  झाली. नेहमीच्या सिताफळांच्या तुलनेत गोल्डन सिताफळे ही आकाराने मोठी, गरदार आणि जास्त दिवस टिकत असल्याने या फळाला ग्राहकांची पसंती मिळत  असल्याची माहिती व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली. 
नेहमीच्या सिताफळाच्या तुलनेत गोल्डन’ हे अधिक देखणे आणि चवीला गोड असते. तुलनेने या सिताफळामध्ये बिया कमी असतात. झाडावरून पिकलेले फळ पडले  तर ते दबते, पण फुटत नाही. फळ झाडावर पंधरा दिवस आणि झाडावरून काढल्यावर आठ दिवस टिकते. दुसर्‍या जातीच्या सिताफळांत तीस ते पस्तीस टक्के गर  असतो, तर गोल्डन सिताफळात पन्नास टक्के गर असतो. सध्या बाजारात पुरंदर तसेच माळशिरस परिसरातून गोल्डन सिताफळांची आवक होत आहे. साधारण 150  ते 600 ग्रॅमपर्यंत या फळाचे वजन भरते. त्यास प्रतिकिलोस 50 ते 170 रुपये भाव मिळत आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस या फळाचा हंगाम सुरू होतो. येत्या  काही दिवसात ही आवक वाढेल, असा अंदाजही मोरे यांनी वर्तविला आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने उत्पादनात घट झाली होती. मात्र, यंदाच्या वर्षी बाजारात दाखल होणारे गोल्डन सिताफळ हे आकाराने मोठे तसेच  चांगल्या दर्जाचे आहे. साधारण दीड ते दोन महिने या ’गोल्डन’ फळाचा हंगाम सुरू राहतो. इतर फळांच्या मानाने गोडी तसेच टिकाऊ असल्याने या फळाला फ्रुट  स्टॉल, ज्युस विक्रेते आदींकडून मोठी मागणी असल्याचेही मोरे यांनी सांगितले.
चौकट
इतर सिताफळाच्या तुलनेत जास्त गर असल्याने ’गोल्डन’ सिताफळाला मागणी असते. यावर्षीही सुमारे 600 ते 650 गोल्डन सिताफळांच्या झाडांची लागवड केली  आहे. प्रत्येक झाडाला 150 ते 200 आसपास फळे लागतात. तसेच, कमी पाण्यावर जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून गोल्डन’ सिताफळ हा सर्वोत्तम पर्याय आहे.  सिताफळांचा एकरी खर्च लागवडीनंतर दरवर्षी पंधरा हजार ते वीस हजार रुपये इतका येतो. तर उत्पन्न चार ते साडेचार लाख रुपयांपर्यंत येऊ शकते,असे शेतकरी  एकनाथ यादव यांनी सांगितले.