Breaking News

राज्यातील 59 अभियांत्रिकी महाविद्यालये बंद होणार

पुणे, दि. 04, सप्टेंबर - राज्यातील 30 टक्क्यांपेक्षा कमी प्रवेश असलेली जवळपास 59 अभियांत्रिकी महाविद्यालये बंद होणार असल्याचे अखिल भारतीय तंत्रशिक्षण  परिषदेने (एआयसीटीई) म्हटले आहे. गेली पाच वर्षे ज्या महाविद्यालयातील 30 टक्क्यांहून अधिक जागा भरल्या जात नाही, ती महाविद्यालये आता बंद होणार  आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे धाबे दणाणले आहेत. 
एआयसीटीइचे अध्यक्ष अनिल सहस्त्रबुद्धे यांनी काल बेंगळूरच्या एका कार्यक्रमात देशातील 800 अभियांत्रिकी महाविद्यालये बंद करण्याचे सूतोवाच केले आहे. देशातील  सर्व राज्यातील किती महाविद्यालये बंद होणार आहेत, त्याची आकडेवारीही त्यांनी प्रसिद्ध केली आहे. त्यात राज्यातील 59 महाविद्यालयांचा समावेश आहे. यापूर्वी  पुण्यातील एका कार्यक्रमात सहस्त्रबुद्धे यांनी प्रवेश रिक्त राहणारे अभियांत्रिकी महाविद्यालये बंद होणार असल्याचे स्पष्ट केले होते. परिणामी, आता शिक्षणसंस्था मोठ्या  अडचणीत सापडले आहेत.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी महत्त्वकांक्षी निर्णय घेत खासगी शिक्षणसंस्थांना विनाअनुदानित तत्वावर शिक्षणाचे दालन खुले केले. त्यानंतर व्यावसायिक  अभ्यासक्रम विशेषत: अभियांत्रिकी महाविद्यालये शिक्षणसंस्थांनी सुरू केले. त्याचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना झाला. मात्र नंतरच्या कालावधीत शिक्षणाचे  व्यापारीकरणाला महत्त्व देत गेल्याने अभियांत्रिकी महाविद्यालयाची गुणवत्ता ढासळत गेली. महाविद्यालयांची संख्या व उत्तीर्ण विद्यार्थी मोठ्या प्रमाणात बाहेर पडू  लागले. मात्र त्यांना पुरेशा संधी उपलब्ध होत नव्हती. त्याचा परिणाम म्हणून अभियांत्रिकीच्या प्रवेशाच्या जागा गेल्या पाच वर्षापासून रिक्त राहत आहेत.
ज्या महाविद्यालयांमध्ये आवश्यक त्या पायाभूत सुविधा नसतात आणि सलग पाच वर्षे ज्या महाविद्यालयांतील 30 टक्क्यांहून अधिक जागा भरल्या जात नाहीत, ती  बंद करायला हवीत, असा एआयसीटीईचा नियमच आहे. मात्र हा नियम आतापर्यंत कागदावर राहिला आहे. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. आता मात्र  ही महाविद्यालये बंद होण्याच्या मार्गावर आहेत. याउलट विद्यार्थीच नसल्याने स्वत: शिक्षणसंस्थांच देशातून दरवर्षी 150 अभियांत्रिकी महाविद्यालये बंद करीत  असल्याचे एआयसीटीने स्पष्ट केले आहे.
राज्यात उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. यंदाही राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील 50  हजारांहून अधिक जागा यावर्षी रिक्त आहेत. बारावीच्या निकालानंतर एक जूनला एमएचसीईटीचा निकालाची घोषणा होताच, दुसर्‍या दिवसापासून अभियांत्रिकीच्या  प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीस सुरुवात करण्यात आली. राज्यातील एक लाख हजार 44 जांगासाठी जवळपास सव्वादोन लाखावर अर्ज आले होते.  त्यामुळे रिक्त जागांचा आकडा तसा कमी राहील, अशी आशा महाविद्यालयांना होती. प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना एक संधी देण्यात आली. सीईटी उत्तीर्ण  झालेल्यांना ऑप्शन भरण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. त्याकडेही विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली. शेवटी अर्जाची संख्या जास्त येऊनही प्रत्यक्ष प्रवेश घेणार्‍या  विद्यार्थ्यांची संख्या कमीच आहे. त्यामुळे रिक्त जागाचा प्रश्‍न यावर्षी कायम असल्याचे चित्र आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून 30  टक्क्यांपेक्षा कमी प्रवेश झालेल्या महाविद्यालयांची यादी एआयसीटीई मागविणार असून, ती महाविद्यालये बंद होणार असल्याचे दिसून येत आहे.