Breaking News

बुधवार पेठेतील जागा विक्री करण्याचा प्रस्ताव सादर

सोलापूर, दि. 27, सप्टेंबर - पालिका परिवहन विभागाचे दिवाळेच निघाल्याचे एकूण चित्र समोर आले आहे. मंगळवारी झालेल्या सभेत बुधवार पेठेतील साडेचार  एकर जमीन चक्क विक्रीला काढण्याचा प्रस्ताव सदस्य संतोष कदम आणि विजय पुकाळे यांनी मांडला. शिवाय सात रस्ता येथील डेपोची जागा ’बीओटी’ (बांधा,  वापरा आणि हस्तांतर करा) या तत्त्वावर देण्याची मागणी पुढे केली. अश्‍विनी रुग्णालयाजवळील जागेवर पंप आणि पूरक व्यवसाय करण्याचा प्रस्ताव दिला.  महापालिका परिवहन विभागाचे एवढे दिवाळे निघालेले असतानाही सदस्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी पुढे करण्यात आली आहे. दोनऐवजी चार हजार  रुपये मानधन पाहिजे, हा विषयही सभेच्या पटलावर आला आहे. त्यामुळे या महापालिकेच्या परिवहनचे पुढे काय होणार? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. एकीकडे  कर्मचार्‍यांचे सात महिन्यांपासून वेतन नाही. त्यावरून महापालिका आयुक्त आणि परिवहन कामगार यांच्यात संघर्ष सुरू झाला. या पार्श्‍वभूमीवर थेट जागा विक्रीचा  प्रस्ताव आल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. वस्तुत: बुधवार पेठेतील जागेत उत्पन्न वाढीचे उपाय करता येतील. पण विकण्याचा घाटच समिती सदस्याकडून रचला गेला  आहे. सध्या या जागेवर कामकाज नाही. त्यामुळे अतिक्रमण वाढले. त्यामुळे तेथील जागा विकून कामगारांची देणी देण्याचे सूचित करण्यात येत आहे. परिवहनचा  विकास आराखड्यात ही बाब नमूद करण्यात आली.