Breaking News

पंकजा मुंडे भगवानबाबांच्या जन्मगावी घेणार दसरा मेळावा

बीड, दि. 30, सप्टेंबर - भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यास गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी विरोध दर्शवल्यामुळे हा मेळावा संत भगवान महाराज यांच्या  जन्मभूमीत पटोदा तालुक्यातील सारगाव येथे घेणार असल्याचे ग्रामविकास व महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. याबाबत ट्विटरवर घोषणा  करताना त्यांनी लिहिले आहे की भगवानबाबांची कर्मभूमी नाही तर जन्मभूमी बोलावतेय, जन्मस्थळाची माती कपाळी लावून नवीन अध्याय सुरू करते .
विरोधकांकडून वंजारा समाजाचे संत भगवान महाराज यांच्याबाबत असलेल्या श्रद्धेचा उपयोग करत राजकीय पेच निर्माण करून पंकजा मुंडे यांना अडचणीत  आणण्याच्या प्रयत्नांना पंकजा मुंडे यानी अत्यंत चातुर्याने व सकारात्मक निर्णय घेत चोख उत्तर दिले असल्याची चर्चा आहे. भगवान गडावर दरवर्षी दसरा मेळावा  घेण्याची परंपरा गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केली होती. मात्र गेल्या वर्षापासून हा मेळावा तेथे घेण्यास विरोध करण्यात येत आहे. या वर्षी प्रशासनानेही तेथे मेळावा  घेण्यास परवानगी नाकारली तर महंत नामदेव शास्त्री यांनी ट्रस्टवर जबाबदारी ढकलत गडावर राजकीय भाषणे नकोत असा निर्णय ट्रस्टने घेतला असल्याने मी तो  निर्णय बदलू शकत नाही असे पंकजा मुंडे यांच्या पत्राला उत्तर म्हणून जाहीर केले होते.