Breaking News

जीएसटी अंतर्गत प्रत्येक ठेकेदारास पालिकेकडे ऑनलाइन नोंदणी बंधनकारक

पुणे, दि. 03, सप्टेंबर - महापालिकेची विविध विकासकामे करणार्‍या ठेकेदारांकडे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) नोंदणी नसल्यास त्यांना बिले देण्यात येणार  नाहीत. त्यासाठीचे आदेश मुख्य लेखापाल विभागाने सर्व विभाग प्रमुख, महापालिका सहायक आयुक्तांना दिले आहे. यापुढे महापालिकेकडून प्रत्येक ठेकेदारास  पालिकेकडे ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जीएसटी रिटर्न भरण्यासाठी ही बाब आवश्यक असल्याने हा निर्णय घेतल्याचे या आदेशात  म्हटले आहे. 
महापालिकेच्या दरवर्षीच्या अंदाजपत्रकात प्रस्तावित विकासकामे नोंदणीकृत तसेच अनोंदणीकृत ठेकेदारांच्या माध्यमातून करून घेतली जातात. केंद्रशासन व  राज्यशासनाने लागू केलेल्या जीएसटी नुसार, या ठेकेदारांच्या बिलातून हा कर वसूल करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेकडून भरण्यात येणार्‍या जीएसटी  रिर्टनसाठी ठेकेदाराचा जीएसटी नोंदणी क्रमांक आणि पॅन कार्ड बंधनकारक आहे. मात्र, अनेक लहान-सहान काम करणार्‍या ठेकेदारांनी अजून जीएसटी नोंदणी  केलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने त्यांची बिले थांबविलेली आहे. तसेच महापालिकेचे काम करणार्‍या ठेकेदारांची संख्या मोठया प्रमाणात असल्याने प्रशासनाने या सर्व  ठेकेदांच्या नोंदीत एकवाक्यता असण्यासाठी त्यांनी वेंडर क्रमांक देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या पुढे जे ठेकेदार पालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी  करून आपली जीएसटीसह सर्व आवश्यक माहिती महापालिकेस सादर करतील आणि वेंडर क्रमांक घेतील, त्याचीच बिले तपासून त्यांना ती द्यावीत असे या आदेशात  स्पष्ट करण्यात आले आहे.