Breaking News

महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांना सरकारी सेवेत घ्या; खा. तुमाने यांची मागणी

नागपूर, दि. 24, सप्टेंबर - महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांची कंत्राटी सेवा रद्ध करून त्यांना कायमस्वरूपी सरकारी नोकरीत समाविष्ट करावे अशी मागणी  खा.कृपाल तुमाने यांनी केली आहे. 
यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केल्यानुसार मुंबई येथे 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राम प्रधान समितीच्या  शिफारशीनंतर महाराष्ट्र सुरक्षा बलाची निर्मिती
करण्यात आलेली होती. शासकीय ठिकाणांवर या जवानांची नेमणूक करण्यात येते. महाराष्ट्र सुरक्षा बल हे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आधीन असून येथील  जवानांना कंत्राटी पद्धतीने सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून प्रति व्यक्ती 25 ते 30 हजार रुपये असे उचल केले  जातात परंतु जवानांना केवळ 12 हजार रुपये मासिक पगार देण्यात येतो. यामध्ये मोठा भ्रष्टाचार असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झालेली आहे. राज्यामध्ये  सुमारे 9000 जवान या अंतर्गत सेवा देत आहेत. काही दिवसांपूर्वी राज्य सुरक्षा महामंडळाच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍न उपस्थित करणार्‍या जवळपास 500 जवानांची सेवा  महामंडळाकडून समाप्त करण्यात आली होती. या विविध समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी खा.कृपाल तुमाने यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
मोठा भ्रष्टाचार- खा. तुमाने
यासंदर्भात खा. तुमाने यांना संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, राज्य सुरक्षा महामंडळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आहे. कागदावर वेगळा आकडा टाकून  प्रत्यक्षात मात्र जवानांच्या हाती तुटपुंजी रक्कम दिली जाते. सेवा पूर्ण आणि पगारात अपहार या प्रकाराला आळा घालण्यासाठी या जवानांना सरकारी सेवेत घेणे  आवश्यक आहे. त्यामुळेयासंदर्भात मुख्यमंत्र्यांना लेखी कळवल्याचे तुमाने यांनी सांगितले.