Breaking News

मुळा धरणाचे 11 दरवाजे उघडले

अहमदनगर, दि. 24, सप्टेंबर - नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे व सर्वात जास्त पाणी साठवण क्षमता असलेले व नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागासाठी वरदान असणारे  मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. 26 टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणातील पाणी साठा 25 हजार 709 दशलक्ष घनफूट इतका झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने धरण  पूर्ण भरल्याचे जाहीर करून धरणाचे सर्वच्या सर्व 11 दरवाजे उघडून त्यामधून सुमारे 2 हजार क्युसेक्स ने नदी पात्रात पाणी सोडण्यास सुरूवात केली आहे.
मुळा नदीचे उगमक्षेत्र असलेल्या अकोले तालुक्यातील कोतूळ येथे सध्या ही पाऊस सुरू आहे.त्यामुळे कोतूळ येथून नदीच्या पात्रात सध्या 1 हजार 500 क्युसेक्स ने  पाणी वाहात असून हे सर्व पाणी मुळा धरणात जमा होत आहे.येत्या 1-2 दिवसांमध्ये धरणातील पाण्याची आवक वाढली तर धरणातून पाण्याचा विसर्ग देखील  वाढविला जाण्याची शक्यता आहे.नगर जिल्ह्यात आकाराने व सर्वात अधिक साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर 1972 पासून धरणात  पाणी साठविले जात आहे.धरणाचे बांधकाम झाल्यापासून मागील 45 वर्षांच्या इतिहासात धरण जवळपास 26 वेळा पूर्ण क्षमतेने भरले आहे.आता यंदा 27 व्या वेळी  मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.नगर शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या या मुळा धरणातून अहमदनगर शहरासहीत अनेक गावे,अहमदनगर  एमआयडीसी व लष्कराला पाणी पुरवठा केला जातो.धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने लाभक्षेत्रातील गावांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.दरम्यान धरणातून पाण्याचा  विसर्ग सुरू झाला असल्याने पुढील काळात पाण्याचा विसर्ग वाढविला तर नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच दिलेला  आहे.साधारणपणे नगर जिल्ह्यात परतीचा पाऊस चांगला होतो हा इतिहास आहे.त्यामुळे पुढील काही दिवसांत परतीचा पाऊस सुरू झाला तर धरणातून पाण्याचा  विसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढविला जाण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे.