Breaking News

पिंपळगाव येथील सोने चोरी प्रकरणी मुद्देमालासह चोरटे पोलिसांच्या ताब्यात

नाशिक, दि. 24, सप्टेंबर - पिंपळगाव येथील सुवर्ण पेढीवर चार कोटी रुपयांच्या दागिण्यांच्या चोरीचा छडा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 24 तासांत लावला असून 3  कोटींच्या दागिण्यांसह चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याप्रकरणात ताब्यात घेण्यात आलेला एक विधी संघर्षरत बालक तो येथे साफसफाईचे काम करत होता. तर दुसरा संजय देवराम वाघ (वय 32, रा. परसूल, ता.  चांदवड) येथील सेल्समन असून या ठिकाणी स्ट्राँग रूम उघडण्याचे व बंद करण्याचे काम तो करत असे.
दिनांक 21 सप्टेंबर रोजी पिंपळगाव बसवंत येथील अशोक चोपडा यांच्या मालकीच्या श्रीनिवास ज्वेलर्स येथून रात्रीच्या सुमारास संशयित चोरट्याने स्ट्राँग रूममधून  तीन कोटी 16 लाख, 50 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले होते. या चोरीदरम्यान त्याने सीसीटीव्हीच्या वायर कापल्याने चोर शोधण्याचे मोठेच आव्हान होते.
या प्रकरणी पोलिस अधीक्षक संजय दराडे व अपर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला  व पोलिस पथकांना मार्गदर्शन केले. त्याच वेळेस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक करपे यांनी समांतर तपास सुरू करत संबंधित ज्वेलर्सकडे नोकरीला  असलेल्या 14 जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली.
त्यादरम्यान तेथे शिपाई कामाला असलेला व आता ताब्यात घेतलेला संशयित विधीसंघर्षरत बालकाचे हावभाव संशयास्पद वाटल्याने त्याला विश्‍वासात घेऊन  विचारपूस केली असता त्याने सेल्समनच्या मदतीने चोरीची कबुली दिली.
काही दिवसांपूर्वी संबंधित शिपायाचे मालकाच्या मुलाशी भांडण झाले होते. त्याचा राग त्याच्या मनात होता. तर सेल्समनला झटपट श्रीमंत व्हायचे होते. त्यानुसार  त्यांनी जवळीक वाढवत चोरीचा प्लॅन आखला.
घटस्थापनेच्या दिवशी त्याने दुकानाच्या चाव्या नेहमीप्रमाणे मालकांच्या घरी ठेवण्याचा बहाणा केला. मात्र रात्री नऊच्या सुमारास सर्वजण झोपल्याची खात्री करून  संशयित संजय वाघ दुकानाच्या मागच्या बाजूने दुकानाची काच फोडून दुकानात शिरला आणि त्याने जवळील चावीने तिजोरी उघडून 10 किलो 475 ग्रॅमचे दागिने  चोरी केले. तसेच दुकानातही सीसीटीव्ही व डीव्हीआर सेटही चोरी करत पुरावा नष्ट केले.
त्यानंतर संशयिताने चोरीच्या माल असलेली बॅग आणि डीव्हीआर सेट परसूल ता, चांदवड येथील त्याचा भाचा गोपीनाथ दत्तू बरकले (25) याच्याकडे लपवून  ठेवण्यास सांगितले. पोलिसांनी तेथे जाऊन डीव्हीआर व दागिन्यांची बॅग हस्तगत गेली.
आता पर्यंत या तिघांकडून 2 कोटी 20 लाख रुपयांचे एकूण 7 किलो 21 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले असून पुढील तपास सुरू आहे.