Breaking News

पद्मभूषण डॉ. विखेंच्या स्मरणार्थ प्रथम पारितोषिक

सर्वच गणेश मंडळांचा होणार सन्मान-वाकचौरे

संगमनेर, दि. 03 (प्रतिनिधी) :- गणेश उत्सवात सहभागी होणार्‍या शहरातील सर्व गणेश मंडळाचा सन्मान मेनरोड शिवसेना शाखेच्या वतीने करण्यात येणार असून,  यावर्षीचे पहिले पारितोषिक लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार असल्याची माहिती कैलास वाकचौरे यांनी दिली.
मेनरोड शिवसेना शाखेच्या वतीने दरवर्षी गणेश उत्सवात सहभागी होणार्‍या गणेश मंडळाचा, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था, कलाकार यांचा सन्मान करण्यात  येतो. विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार्‍या गणेश मंडळासाठी प्रोत्साहन म्हणून विविध सन्मान करण्याची परंपरा कायम ठेवली असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले.
यावर्षीच्या या सन्मान सोहळ्यात पहिले पारितोषिक पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार आहे. द्वितीय पारितोषिक जेष्ठ शिवसैनिक  स्व. शाम तांबे आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक स्व. सावित्रीबाई हरिश्‍चंद्र वलवाणी यांच्या स्मरणार्थ देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे वाकचौरे म्हणाले.  
संगमनेरची गणेश विसर्जन मिरवणुक ही नेहमीच भव्य दिव्य होत असते. मंडळाबरोबर नागरिकांचा सहभाग उत्साही असतो. या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी  शिवसेना मेनरोड शाखेच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्याकरिता उपस्थित राहाण्याचे आवाहन दता भांदूर्गे, अमित पवार, भैय्या तांबोळी, गोटूशेठ अट्टल, शशी  घोलप, कृष्णा केसेकर, विनायक नागरे, संजय वलवाणी, रमेश सस्कर, छोटू केसेकर, अतुल कासट, अ‍ॅड. दिलीप साळगट, सुनिल देशमुख, नारायण वाकचौरे  आदींनी केले आहे.