Breaking News

स्वच्छता ही नियमित सवय व्हावी - आयुक्त डॉ.रामास्वामी एन.

नवी मुंबई, दि. 22, सप्टेंबर - ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत जानेवारी 2018 मध्ये होणा-या ‘स्वच्छ सर्वेक्षण 2018’ च्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ.  रामास्वामी एन. यांनी संबंधित विभागप्रमुख, विभाग अधिकारी व अधिकारी यांची विशेष बैठक घेऊन शहरातील स्वच्छता विषयक कामांचा सविस्तर आढावा घेतला.  याप्रसंगीअतिरिक्त आयुक्त (शहर) श्री. अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त (सेवा) श्री. रमेश चव्हाण, स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाचे उप आयुक्त श्री. तुषार पवार,  परिमंडळ-1 चे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, परिमंडळ-2 चे उप आयुक्त श्री. अंबरीश पटनिगीरे तसेच सर्व विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग  अधिकारी, कार्यकारी अभियंता, स्वच्छता अधिकारी, सर्व स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाचे अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी स्वच्छ सर्वेक्षण 2018 च्या अनुषंगाने प्राप्त प्रश्‍नावलीतील निकषांबाबत विषयनिहाय चर्चा करण्यात आली. निकषांनुसार आढळलेल्या त्रुटींची आगामी दोन  महिन्यांच्या कालावधीत पूर्तता करण्याबाबत आयुक्तांनी सूचना दिल्या.
यामध्ये घनकचरा व्यवस्थापन नियम, 2016 च्या अनुषंगाने घनकचरा निर्मितीच्या जागीच ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करणे बंधनकारक असून ज्या संस्था  अशाप्रकारे कचरा वर्गीकरण करणार नाहीत त्या संस्थांचा कचरा दिनांक 15 ऑक्टोबर, 2017 पासून उचलला जाणार नाही असे सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे  100 कि.ग्रॅ. पेक्षा जास्त असा मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणा-या गृहनिर्माण संस्था, हॉटेल्स व इतर संस्थांना संस्थेच्या आवारातच कम्पोस्टींग पीट, बायोगॅस  अशाप्रकारे कच-यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. ज्या संस्था अशाप्रकारे कच-यावर प्रक्रिया करणार नाहीत, त्या संस्थांचाही कचरा 15 ऑक्टोबर 2017  पासून उचलला जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला.
शहरातील सर्व शाळा, उद्याने व महानगरपालिकेची कार्यालये इ. ठिकाणी कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी कंपोस्टींग पीटस् बांधण्याचे आदेश देण्यात आले असून  इतर शासकीय कार्यालये, खाजगी शाळा, महाविद्यालये इ. ठिकाणीही कंम्पोस्टींग पिटस् बांधणेबाबत संबंधित संस्थांना कळविण्यात येणार आहे.