Breaking News

शिवसेनेची मोदींच्या विरोधात टोकाची घोषणाबाजी

मुंबई, दि. 23, सप्टेंबर - महागाईविरोधात शिवसेनेने आज आंदोलन सुरु केलं आहे.  मुंबईतल्या वेगवेगळ्या 12 ठिकाणी हे आंदोलन होत आहे.  पेट्रोल दरवाढीचा  भडका उडाला असताना दिवसेंदिवस होत असलेल्या महागाईला सेनेनं विरोध दर्शवला आहे.
दुर्देवानं ही पाळी आमच्यावर आली असून सत्तेत असलो, तरी सत्तेची चावी ज्यांच्या हातात आहे, त्यांनी ही भाववाढ केल्याचं शिवसेना खासदार विनायक राऊत  यांनी म्हटलं आहे. नरेंद्र सरकार हाय हाय, देवेंद्र सरकार हाय हाय, अशा घोषणा देत शिवसैनिकांनी सरकारचा निषेध केला.  मात्र कहर म्हणजे सत्तेत असलेल्या  शिवसेनेने ‘एवढी माणसं कशाला, मोदींच्या मयताला’अशा घोषणा देत टोक गाठलं. सीएसटी परिसरात खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत यांच्या नेतृत्त्वात  आंदोलन सुरु आहे. त्यावेळी या घोषणा ऐकायला मिळाल्या. यावेळी शिवसेनेने महागाईचा प्रतिकात्मक राक्षसही आणला होता. आंदोलनावेळी अनिल देसाई आणि  अरविंद सावंत यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं.
विभाग क्रमांक 3 मध्ये विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी आणि शिवसैनिकांसह जोगेश्‍वरी स्थानक पूर्व येथे  महागाईविरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत.