Breaking News

वैशालीच्या मृत्यूप्रकरणी डॉ.स्नेहल नरवडे निलंबित, तर कंत्राटी अधिपरिचारिका सेवेतून बडतर्फ

मुंबई, दि. 23, सप्टेंबर - उपचारासाठी भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल झालेल्या वैशाली डामरेचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच झाल्याचे समोर  आल्याने डॉ. स्नेहल नरवडेला यांना निलंबित करण्यात आले. तर कंत्राटी अधिपरिचारिका पल्लवी बंदागळे यांना सेवेतून बडतर्फ केल्याचा आदेश आयुक्त डॉ. नरेश  गीते यांनी आज दिले.
मालेगावला राहणारी वैशाली गणेशोत्सवासाठी भाईंदर येथे राहणा-या आपल्या आई-वडीलांकडे आली होती. 12 सप्टेंबरला तिला प्रकृती अस्वास्थ्यामुळे जोशी  रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी तिची बाह्य रुग्ण विभागात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला तेथील मानद सेवा देणा-या खाजगी  डॉक्टरकडून देण्यात आला. तत्पुर्वी तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आलेल्या अहवालात तिच्या रक्तबिंबीका (प्लेटलेटस्) अत्यंत कमी असल्याचे नुमद करण्यात  आले होते. तो अहवाल त्यावेळी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉ. नरवडे यांना तिच्या नातेवाईकांनी दाखविला होता. हा आजार जिवितावर बेतणारा असतानाही  त्यावर गांभीर्य न दाखविता डॉ. नरवडे यांनी तिला न तपासताच रुग्णालयात दाखल करुन घेतले.
तीला दाखल केल्यानंतर महिला विभागात कर्तव्यावर असलेल्या अधिपरिचारिका पल्लवी बंदागळे यांनी तिच्यावर सामान्य रुग्णाप्रमाणे उपचार करुन डॉ. नरवडे यांना  उपचारासाठी अनेकदा फोनवरुन संपर्क साधला. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यातच रुग्णालयात अतिदक्षता विभाग नसल्याने तिला अन्य रुग्णालयात  हलविणे आवश्यक होते. परंतु नरवडे यांनी त्याची दखल न घेतल्याने वैशाली अखेर बेशुद्ध पडली. त्यावेळी मात्र डॉ. नरवडे यांनी तिला तपासले. यानंतर वैशालीला  लगतच्या कस्तुरी मेडीकेअर या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे तीला मृत घोषित केल्यानंतर पुन्हा तीला जोशी रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान  वैशालीचा मृत्यू हलजर्गीपणामुळेच झाल्याचा आरोप तीच्या नातेवाईकांनी केल्याने आयुक्तांनी पालिकेचे प्रभारी मुख्य आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली चौकशी  समिती नियुक्त केली. त्यात डॉ. नरवडे व पल्लवीवर हलगर्जीचा ठपका ठेवण्यात आला. त्याचा अहवाल गुरुवारी आायुक्तांना सादर केल्यानंतर आयुक्तांनी शुक्रवारी  कारवाईचा आदेश दिले आहेत.