Breaking News

कोल्हेवाडीत बिबट्या जेरबंद, शेतकर्‍यांचे पशुधन धोक्यात

संगमनेर तालुक्यात बिबट्यांची दहशत

संगमनेर, दि. 02, सप्टेंबर - संगमनेर तालुक्यात बिबट्यांंच्या संख्येत लक्षणिय वाढ होताना दिसत आहे. त्यांच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. शेतकरी वर्गाचे पशुधन धोक्यात तर आलेच मात्र मानवावरील वाढते हल्ले चिंतेचा विषय बनले आहे. मागणीनुसार वनविभाग पिंजरे लावत असले तरी बिबट्यांची संख्या बघता पिंजरे कमी असल्याने वनविभागाची डोकेदुखी ठरत आहे. तालुक्यातील कोल्हेवाडी येथील पानमळा येथे लावण्यात आलेल्या पिंजर्‍यात बुधवारी पहाटे अडीच वर्षाचा मादी जातीचा बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्‍वास सोडला आहे.
संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी, घुलेवाडी, पिंपपळगाव कोंझीरा, समनापूर, कोल्हेवाडी, आश्‍वी, चंदनापुरी, धांदरफळ, घारगांव, साकुर, जोर्वे, संगमनेर खुर्द, खांडगाव, कर्‍हे आदी भागात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात उसाचे व चार्‍याचे क्षेत्र या पिरसरात मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांना आश्रयासाठी जागा उपलब्ध होत आहे. त्याची लक्षणिय संख्या असल्याने त्यांचे दर्शन आता दिवसाही होवू लागले आहे. शेतकर्‍यांच्या पशुधनाबरोबरच मानवावरील वाढते हल्ल्यांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. बिबट्यांच्या वावरामुळे शेती करणे मुश्किल झाले आहे. विजेचा लपंडाव व बिबट्यांच्या वावराने शेतात पाणी भरणे तर सोडाच बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे घराबाहेर पडणे  तसेच मुला-मुलींना शाळेत पाठवणे जिकरीचे बनले आहे. बिबट्याच्या भितीने सातच्या आत घरात बसण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
बिबट्यांनी हल्ले करून पशुधनावर ताव मारण्याच्या अनेक घटना तालुक्यात घडल्या आहेत. बिबट्यांचे दर्शन होताच पिंजरे लावण्याची मागणी ग्रामस्थ वनविभागाकडे करत असले तरी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी गांभिर्याने घेताना दिसत नाही. हल्ला होईल तेथेच पिंजरे लावले जात आहे. पिंजर्‍याची मागणी वाढल्याने वनविभाकडे पिंजर्‍यांची संख्या कमी असल्याचे बोलले जाते. धास्तावलेल्या शेतकर्‍यांनीच आता महत्वाची भूमिका बजवावी, अशी मागणी महिला वर्तातून होत आहे. जंगलातील बिबट्यांचे खाद्य संपुष्टात आल्याने ते आता मानवी वस्त्यांकडे वळले आहेत. पाण्याची सोय तर उपलब्ध असली तरी बिबट्यांना भक्ष मिळवण्यासाठी आटापिटा करावा लागत आहे. यातून अनेक निष्पाप बालकांना त्यांच्या भक्षस्थानी गेल्याच्या घटना ताज्या आहेत.
शेतकर्‍यांनी बिबट्यांच्या भक्षासाठी जंगलात नवजात जरसी गोरे व भाकड जनावरे सोडावीत, जेणे करून बिबटे मानवी वस्त्यांकडे येणार नाहीत. वनविभागावर अवलंबून न राहात शेतकरी व ग्रामस्थांनी स्थानिक पातळीवर उपाय योजना कराव्यात, अशी हाक महिला वर्गातून दिली जात आहे. मागील पंधरवाड्यात पिंपळगाव कोंझिरा येथे तीन महिन्यापासून धुमाकूळ घालण्यार्‍या बिबट्या वनविभागाने जेरबंद केले होते. कोल्हेवाडी शिवारातही दोन महिन्यांपासून बिबट्या मादी व तिच्या बछड्यांनी चांगलाच धुमाकूळ घालून दहशत निर्माण केली आहे. कुत्रे, शेळ्या, मेंढ्या, जनावरे, वासरे, कोंबड्यावर बिबटे ताव मारताना दिसत आहेत. येथील ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार दोन महिन्यानंतर पाच दिवसांपुर्वी वनविभागाने कोल्हेवाडी शिवारातील पानमळे येथील किशोर कोल्हे यांच्या शेतात पिंजरा लावला होता. बुधवारी पहाटेच्या सुमारास भक्षाच्या शोधार्थ असलेली अडीच वर्षाची मादि व तिचे बछडे या भगात आले होते. पिंजर्‍यात ठेवलेल्या कोंबड्यांच्या वासाने बिबट्यामादी अलगत पिंजर्‍यात अडकली.
दरम्यान या घटनेची माहिती वनविभगाला देण्यात आली. नवक्षेत्रपाल बी. एल. गिते, वनरक्षक संतोष पारधी, वनपाल शिवाजी डांगे, संपत ढेरंगे, बाबुराव थोरात आदींनी घटनास्थळी धाव घेवून बिबट्याला ताब्यात घेतले. त्यांना निंभाळेच्या रोपवाटीकेत नेवून संध्याकाळी त्याला जंगलात सोडण्यात आले. बिबट्याला बघण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होता. मागणी होताच वनविभागाने पिंजरे लावावेत, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.