Breaking News

लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नराधमाला पोलीस कोठडी

पुणे, दि. 01, सप्टेंबर - लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या आरोपीला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरुवारी  विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी ही कोठडी सुनावली. स्वागत रामदास हांडे (वय 24 रा. पिंपळगाव जोगा, ता. जुन्नर) असे त्या बलात्कारी आरोपीचे नाव  आहे.
याप्रकरणी 17 वर्षीय पीडित मुलीने पोलिसात तक्रार दिली होती. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर जून महिन्यामध्ये वाघोली येथील पडक्या घरात आणि  मोकळ्या जागेत वारंवार बलात्कार केला होता. आरोपीने शरीरसंबंध ठेवण्यासाठी पीडितेला अनेक वेळा ठार मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात  आले आहे. आरोपीने पीडितेला दिलेल्या धमकीला घाबरुन तिने हा तिच्यावर झालेला अत्याचार कोणास सांगितला नव्हता. मात्र सततच्या बलात्काराने पीडित मुलगी  गर्भवती राहिल्याने हा प्रकार उजेडात आला.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करुन गुरुवारी न्यायालयात हजर केले होते. आरोपीच्या डीएनएची चाचणी आणि वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.  अधिक तपास करण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली. ही मागणी ग्राह्य धरत  न्यायालयाने हांडे याला पोलीस कोठडी सुनावली.