Breaking News

अकोलेतील शासकीय मुलींच्या वसतिगृहाची महिला आयोगाच्या सदस्यांकडून पाहणी

अकोले, दि. 01, सप्टेंबर - राजूर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत अकोले येथे सुरु असलेल्या शासकीय मुलींच्या वसतिगृहास राज्य महिला आयोगाच्या  सदस्या अ‍ॅड. आशाताई लांडगे यांनी भेट देऊन वसतिगृहातील विद्यार्थिनींशी संवाद साधला. त्यांना सोयीसुविधा मिळतात की नाही याची माहिती घेतली.
या वसतिगृहातील अनेक तक्रारींचा पाढा महिला आयोगाकडे गेला होता. काल अचानक महिला आयोगाच्या सदस्या श्रीमती लांडगे यांनी वसतिगृहात प्रवेश करताच  विद्यार्थीनींच्या सदनिकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. पाणी, शौचालय, क्रीडांगण या सुविधांबरोबरच विद्यार्थिनींना शासकीय वस्तूंचा लाभ मिळतो का याची  विचारणा केली. यावेळी वसतिगृहाच्या गृहपाल श्रीमती आर.के. पवार यांना वसतिगृहाबाहेरच ठेवण्यात आले. रस्त्यावरील वसतिगृहामुळे विद्यार्थिनींना अनेक समस्यांना  सामोरे जावे लागते. शौचालयांची दूरावस्था तसेच क्रीडांगणाची कोणतीही सुविधा येथे उपलब्ध नसल्याची तक्रार विद्यार्थींनींनी केली. काही पालकांनी प्रकल्प  कार्यालयाकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या मात्र दखल घेतली गेली नाही. येथील रहिवाशांनी महिला आयोगाकडे थेट संपर्क साधला. महिला आयोगाने याची दखल  घेत या वसतिगृहाची पाहणी केली.
दरम्यान, प्रकल्पाधिकारी संतोष ठुबे व शिक्षणाधिकारी अंबादास वाकचौरे यांचेकडे चौकशी केली असता झालेल्या प्रकाराबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगत  राज्य महिला आयोगाच्या सदस्यांना कोणत्याही क्षणी, कोठेही भेट देता येते असे सांगितले.