Breaking News

’मन की बात’मध्ये मोदींनी हिंदू-मुस्लिम ऐक्यावर बोलावे - सय्यदभाई

पुणे, दि. 27, सप्टेंबर - धार्मिकदृष्टया समाज अजूनही एकात्म झालेला नाही. राष्ट्रीय एकात्मता जपायची असेल तर धार्मिक एकात्मतेसाठी एकमेकांमध्ये संवाद  असायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील 125 कोटी लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करत जगभर फिरत आहेत. ’सबका साथ सबका विकास’, असे सांगत आहेत.  मात्र, यात मुस्लिम समाज कोठेच दिसत नाही. पंतप्रधान देशात लवकरच समान नागरी कायदा आणतील, असा विश्‍वास आहे. ते दर रविवारी ’मन की बात’ करतात.  त्यामध्ये त्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्यावर बोलले पाहिजे, असे मत समान नागरी कायद्याचे समर्थक सय्यदभाई यांनी व्यक्त केले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय नागरी सहकारी पतसंस्थेच्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त पं. दीनदयाळ उपाध्याय पुरस्कार सय्यदभाई आणि भारतीय किसान संघाचे  ज्येष्ठ समाजसेवक शंकरराव शेलार यांना प्रदान करण्यात आला. शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज शेजारील पी.ई.सोसायटीच्या हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला  महापौर मुक्ता टिळक, अ‍ॅड. दादासाहेब बेंद्रे, आमदार बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे,  नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, पतसंस्थेचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, उपाध्यक्ष दुर्गेश सावरगावकर, सचिव प्रकाश शेलार, खजिनदार अमृत लुणे यांसह सर्व संचालक  उपस्थित होते. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व अकरा हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप होते.
सय्यदभाई म्हणाले की, देशात समान नागरी कायदा होऊ पाहत असताना दुसरीकडे मुस्लिम समाजाबद्दल वेडे वाकडे बोलले जात आहे. कायद्याने सर्व प्रश्‍न सुटणार  नाहीत, त्यासाठी सर्वांमध्ये बदल होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मनात मुस्लिम समाजाबद्दल काही गैरसमज आहेत. देशात भिन्न स्वरुपाची धार्मिक  एकात्मता येण्यासाठी संघाने कार्यक्रम हाती घ्यावा, त्यास आम्ही सहकार्य करू. संघाने याची सुरूवात पुण्यापासून करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
महापौर टिळक म्हणाल्या की, समान नागरी कायदा येईल की नाही हे माहीत नाही. मात्र, प्रत्येकाने मनात समानता ठेवली पाहिजे. त्यातून देशाची प्रगती होऊन  पुढची पिढी सक्षम होईल. पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्म मानववादाची बीजे समाजात पेरण्याचे काम केले, असेही त्या म्हणाल्या.
मिलिंद एकबोटे म्हणाले की, पतपेढीही पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रेरणेने काम करते. नोटबंदी नंतर सुद्धा पतपेढीला अ वर्ग मिळाला आहे. गेल्या वर्षी राज्यात  दुष्काळ पडला होता. दुष्काळामुळे राज्यातील अनेक शेतक-यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना मदत व्हावी म्हणून कृतज्ञता निधी  देण्याचा निर्णय पतपेढीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पुरस्कार वितरण समारंभापूर्वी पं.तुषार रिठे आणि सहका-यांचा गीतरामायणाचा  सुश्राव्य कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. नंदकिशोर एकबोटे यांनी सूत्रसंचालन केले.