Breaking News

रोहिंग्या मुस्लिम समुहास मदतीची मागणी करणे चुकीचे - अमर साबळे

पुणे, दि. 27, सप्टेंबर - बौद्ध धर्मीय म्यानमार देशामध्ये स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचे लक्ष्य साध्य करण्यासाठी ‘रोहिंग्या सॉलिडॅरिटी ऑर्गनायजेशन’ ह्या दहशतवादी  संघटनेच्या माध्यमातून दहशतवाद आणि बौद्धांच्या कत्तली केल्याने म्यानमार सरकार आणि योद्धा बौद्ध भिक्खू विराथू यांनी आक्रमक कारवाई करताच रोहिंग्या  मुसलमान समूहास देशातून परागंदा होण्याची वेळ आली. अशा अतिरेकी रोहिंग्या मुसलमान समुहास भारत देशाने मदत करावी, अशी मागणी करणे धोकादायक  असल्याचे भाजप खासदार अमर साबळे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
रोहिंग्या मुसलमान प्रश्‍नाकडे धर्म-जातीच्या चष्म्यातून पाहू नये, असे भारतातील काही राजकीय नेते सांगतात. तर, त्या प्रश्‍नाकडे मानवतावादी दृष्टीकोनातून पहावे असे  काही नेते म्हणतात. मग रोहिंग्या मुसलमानांच्या समर्थनार्थ हिब्ज-ए- इस्लामी, जमात-ए-इस्लामी, हरकत-उल- जिहाद या दहशतवादी संघटना सक्रिय कशा  झाल्या? रझा अकादमीने मुंबईत 2012 साली आझाद मैदानावरून मोर्चा का काढला? आणि इंडोनेशियातील फोरम उलाम-इस्लाम या दहशतवादी संघटनेने  म्यानमारमधील बौद्धाविरूद्ध जिहादाची घोषणा करून जकार्तामध्ये म्यानमार दूतावासाची इमारत बॉम्बने उडविण्याचा प्रयत्न केला तो निधर्मी होता की मानवतावादी  होता? असा प्रतिप्रश्‍न साबळे यांनी उपस्थित केला आहे.
स्वातंत्र्यानंतरच्या सुमारे 60 वर्षाच्या काँग्रेस राजवटीनंतरही भारतीय मुस्लिमांची दयनीय स्थितीचा अहवाल सच्चर कमिशनने सादर केला आहे. त्या भारतीय  मुस्लिमांच्या विकासाची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘सबका साथ, सबका विकास’ तत्वाने राबविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही साबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या  पत्रकात म्हटले आहे.