Breaking News

’तासगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करा’

सांगली, दि. 03, सप्टेंबर - तासगाव तालुक्यात भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे खरिपाची पिके पाण्याअभावी होरपळून  गेली आहेत. त्यामुळे तासगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात यावा व अपूर्ण उपसा जलसिंचन योजना तातडीने पूर्ण कराव्यात. अन्यथा, तासगाव तालुका  शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा तासगाव तालुका युवा सेनेचे अध्यक्ष अमोल काळे यांनी दिला आहे. अमोल काळे यांच्या नेतृत्वाखालील  युवा सेनेच्या शिष्टमंडळाने तासगाव तहसिलदार यांना या मागणीचे निवेदन दिले. या शिष्टमंडळात अनिल शिंदे, धनाजी डांगे, सचिन चव्हाण, सुनिल पाटील, श्रीकांत  शिंदे, पवन बोबडे, रणजित चव्हाण, महेश पाथरवट व अभिजित पवार यांचा समावेश होता. तासगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करण्यात यावा व अपूर्ण  उपसा जलसिंचन योजना तातडीने पूर्ण कराव्यात, यासह शेतकर्यांची संपूर्ण वीजबिले माफ करावीत, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, पावसाअभावी वाळून  गेलेल्या पिकांचे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी व प्रादेशिक पाणी योजना सुरू कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या  मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर तासगाव तालुका युवा सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही अमोल काळे यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.