Breaking News

सांगली जिल्ह्यातील 453 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर

सांगली, दि. 03, सप्टेंबर - सांगली जिल्ह्यातील 699 पैकी 453 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या ग्रामपंचायतींसाठी दि. 22  सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. दि. 14 ऑक्टोबर रोजी मतदान, तर दि. 16 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. ग्रामपंचायत  निवडणूक आचारसंहितेमुळे सांगली जिल्हा नियोजन समितीकडील सुमारे 50 कोटी रूपयाहून अधिक विकासकामे लांबणीवर पडली आहेत.
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील 46, तासगाव 26, कवठेमहांकाळ 27, जत 81, शिराळा 60, वाळवा 91, कडेगाव 43, पलूस 16, आटपाडी 26, तर  मिरज तालुक्यातील 38 अशा एकूण 453 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
या ग्रामपंचायतींसाठी दि. 22 ते 29 सप्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. दाखल उमेदवारी अर्जांची दि. 3 ऑक्टोबर रोजी छाननी  केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत दि. 5 ऑक्टोबर असून त्याच दिवशी दुपारी तीन वाजता संबंधित उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप  व उमेदवार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी दि. 14 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून दि. 16 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल  जाहीर केला जाणार आहे.