Breaking News

कार्यालयातील स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे- बबनराव लोणीकर

Noनाशिक, २९ सप्टेंबर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार देशात राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ भारत अभियाना’ला गती देण्यासाठी मोहिमेची अंमलबजावणी करणाऱ्या शासकीय कार्यालयांनी देखील स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. जिल्हा परिषद कार्यालयाच्या भेटी प्रसंगी ते बोलत होते. 
लोणीकर यांनी आज नाशिक शहरातील महत्वाच्या शासकीय कार्यालयांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी सर्वच कार्यालयांना स्वच्छता राखणे बरोबरच, शासकिय दस्तऐवजांचे जतन करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत कागदपत्रांचे जतन करण्याचे निर्देश दिले.
जिल्हा परिषदेस भेटी प्रसंगी अध्यक्षा शितल सांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, अर्थ व बांधकाम सभापती मनिषा पवार, समाजकल्याण सभापती सुनिता चारोस्कर आदी उपस्थित होते.
यावेळी लोणीकर म्हणाले, जिल्हा परिषदेची भूमिका मिनी मंत्रालयाची असून त्यांनी कामकाजात बदल करण्याची आवश्यकता आहे. पारंपरिक पद्धत बाजूला सारून संगणकीय यंत्रणेचा वापर करीत आधिकाधीक माहितीचा साठा करण्यात यावा. यासाठी महत्वाचे दस्तऐवज, नस्त्या यातील कागदपत्रांचे स्कॅनिंग करुन ठेवावे. यामुळे काम करणारे अधिकारी कर्मचारी यांनी अधिक चांगली जागा उपलब्ध होईल व कामाच्या ठिकाणी उत्साहाचे आणि पोषक वातावरण निर्माण होईल.
ते म्हणाले, कार्यालयातील कागदपत्रांचे डिजीटायझेशन करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना, नाविन्यपूर्ण योजना व नियमित अनुदानामधून निधी उपलब्ध करुन घेण्यात यावा. 21 शतकामध्ये वाटचाल करताना संगणकाचा वापर करण्याच्या काळात कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यात यावी, असे लोणीकर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील भेटी दरम्यान मंत्री महोदयांनी महसूल शाखा, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, वन हक्क शाखा, जिल्हाधिकाऱ्यांचे दालन आदींची पाहाणी केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हाधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे उपस्थित होते.
पोलिस आयुक्त कार्यालयातील भेटी दरम्यान त्यांनी कार्यालयातील संगणक वापर, स्वच्छता व सुसज्जतेबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल, उपायुक्त विजय मगर, लक्ष्मीकांत पाटील आदी उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयास त्यांनी भेट दिली. तसेच येथे सुरु असलेल्या दस्तऐवज व नस्त्यांचे स्कॅनिंग करुन जतन करण्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी मुख्य अभियंता पगारे व विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.