Breaking News

कोलकाताच्या इडन गार्डनवर आज दुसरा एकदिवसीय सामाना

कोलकाता, दि. 21, सप्टेंबर - भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला दुसरा वन डे सामना उद्या कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवण्यात येत आहे. टीम इंडियानं  चेन्नईची पहिली वन डे जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. चेन्नईच्या पावसानं पहिल्या वन डेत ऑस्ट्रेलियाला खरं तर ट्वेन्टी ट्वेन्टीला साजेसं आणि  पाठलागासाठीही सोपं लक्ष्य दिलं होतं. पण सरशी टीम इंडियाचीच झाली.
चेन्नईच्या त्या वन डेत कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल या मनगटी फिरकी गोलंदाजांनी चेन्नईच्या वन डेत गाजवलेलं वर्चस्व लक्षात घेता ऑस्ट्रेलियाच्या  फलंदाजांनी उर्वरित सामन्यांमध्येही त्यांचा धसका घेतलेला दिसला, तर आश्‍चर्य वाटायला नको. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्‍वर कुमार या मध्यमगती  गोलंदाजांनीही पहिल्या वन डेत आपली भूमिका चोख बजावली. त्यामुळंच विजयासाठी 21 षटकांत 164 धावांचं माफक आव्हानही कांगारूंना डोईजड ठरलं.
टीम इंडियानं चेन्नईत ऑस्ट्रेलियावर मिळवलेला विजय हा दिसायला एकतर्फी असला तरी भारतीय फलंदाजांनाही या सामन्यात संघर्ष करावा लागला. नॅथन कूल्टर  नाईल आणि मार्कस स्टॉईनिसनं भारताचा निम्मा संघ 87 धावांमध्येच माघारी धाडला होता. त्या पार्श्‍वभूमीवर भारताच्या प्रमुख फलंदाजांकडून कोलकात्यात सुधारित  कामगिरीची अपेक्षा करण्यात येत आहे.