Breaking News

कुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे भारत महासत्तेच्या दिशेने - मुख्यमंत्री

मुंबई, दि. 24, सप्टेंबर - सध्याच्या कालखंडात भारत हा सर्वाधिक तरुण लोकसंख्येचा मोठा लाभार्थी असून जगाला कुशल मनुष्यबळ पुरविण्याची क्षमता भारतात  आहे. या तरुणाईने निष्ठेने प्रयत्न केल्यास भारत निश्‍चितच जगातील एक प्रमुख महासत्ता होऊ शकेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हैदराबाद  येथे व्यक्त केला.
हैदराबाद येथील इंडियन स्कूल ऑफ बिझिनेसतर्फे आयोजित ‘लीडरशीप समिट -2017’ मध्ये मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या प्रतिष्ठेच्या परिषदेत निमंत्रित  केल्याबद्दल संयोजकांचे आभार व्यक्त करुन मुख्यमंत्री म्हणाले, सध्या ‘पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स’ आणि ‘कॉम्पिटिटिव्ह फेडरॅलिझम’चे युग आहे. राजकीय  क्षेत्राप्रमाणेच वाणिज्यिक क्षेत्रातही मोठे परिवर्तन घडत आहे. जागतिक पातळीवर भारतीय नेतृत्वाची उपेक्षा होण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले असून प्रतिष्ठेच्या  अमेरिकन सिनेटमध्ये देशाच्या प्रधानमंत्र्यांना तब्बल 50 वेळा ‘स्टॅण्डींग ओवेशन’चा सन्मान प्राप्त झाला आहे. प्रधानमंत्र्यांनी राजकीय क्षेत्राची व्याख्याच बदलून  टाकली आहे. प्रभावी नेतृत्वासोबतच नागरिकांना प्रेरणा देऊन परिवर्तनाची प्रक्रिया गतिमान करण्यात श्री. मोदी यांनी मोठी भूमिका बजावली आहे. एखादी कॉर्पोरेट  संस्था आणि शासन यांचे नेतृत्व करणे ही आता समान बाब झाली आहे. या दोन्हींचे नेतृत्व करताना स्वत:ला सिद्ध करणे हाच आता महत्त्वाचा मुद्दा ठरु लागला  आहे, असे त्यांनी सांगितले
महाराष्ट्राचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर राज्यात विविध क्षेत्रात सुरु झालेल्या परिवर्तन प्रक्रियेची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही राज्याची सुत्रे हाती घेतली तेव्हा  कृषी क्षेत्रातील वाढीचा दर नकारात्मक होता. रोजगार निर्मितीसाठी कोणतेही भरीव प्रयत्न झाले नव्हते. शासकीय मदत आणि पुनर्वसनावर अवलंबून असणार्‍या शेती  क्षेत्रात गुंतवणुकीचे पर्व आम्ही सुरु केले. कृषी क्षेत्रात केलेल्या विविध सुधारणांमुळे राज्यातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नात चाळीस हजार कोटींची वाढ झाली आहे. या  सुधारणांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असल्याची प्रशंसा नीती आयोगाने केली आहे. केवळ धरणांच्या उभारणीपुरते मर्यादित असलेले सिंचनाचे  प्रयत्न आम्ही शाश्‍वत पातळीवर नेले. जलसंधारणाच्या विविध 14 योजनांचे एकत्रिकरण करुन त्यांची ‘जलयुक्त शिवार’च्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे  अंमलबजावणी केली. आज हे अभियान केवळ शासकीय पातळीवर मर्यादित राहिले नसून ते एक जनआंदोलन झाले आहे. राज्यात त्या माध्यमातून जलक्रांती होत  असून आमच्या सरकारच्या कार्यकाळात 22 हजार गावे दुष्काळमुक्त होत आहेत.
राज्याच्या प्रशासनाला डिजिटल आयाम दिल्याने ते अधिक गतिमान आणि पारदर्शक झाल्याची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात आम्ही सेवा हमी  कायद्याची अंमलबजावणी सुरु केली. यासोबतच विविध प्रकारच्या 379 सेवा ऑनलाईन उपलब्ध केल्या असून ‘आपले सरकार’ पोर्टलच्या माध्यमातून आजवर 1  कोटी 10 लाख अर्ज निकाली काढली आहेत. उद्योग सुलभतेसाठी उद्योग उभारणीबाबतचे सर्व परवाने आता ऑनलाईन उपलब्ध झाले आहेत. गुंतवणूकदारांचा  सरकारवरील विश्‍वास वाढल्याने देशात आलेल्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी 50 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. प्रशासनातील हे परिवर्तन  गावपातळीवर नेण्यात आम्हाला यश आले आहे. राज्यातील ग्रामपंचायती डिजिटली जोडण्यात येत असून, त्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि इतर सेवा-सुविधा  प्रभावीपणे देण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.
राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी स्थापित केलेल्या ‘वॉर रुम’ या संकल्पनेबाबत माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईतील विविध महत्त्वाच्या  प्रकल्पांसाठी आवश्यक असणार्‍या अनेक मंजुर्‍या यापूर्वी वर्षानुवर्षे प्रलंबित होत्या. त्याबाबत आम्ही तातडीने कार्यवाही करण्यासह केंद्र सरकारकडे प्रभावीपणे  पाठपुरावा केला. प्रधानमंत्र्यांच्या सहकार्यामुळे या परवानग्या अतिशय जलदगतीने मिळाल्या आणि आता या प्रकल्पांचे प्रत्यक्ष काम सुरु होत आहे. मुंबई मेट्रो, उन्नत  मार्ग, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यासह इतर महत्वाकांक्षी प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या माध्यमातून गेल्या 60  वर्षांमध्ये 70 लाख प्रवासी प्रतिदिन क्षमता निर्माण झाली असताना पुढील चार वर्षात आम्ही 90 लाख प्रवासी प्रतिदिन क्षमता निर्माण करीत आहोत. सार्वजनिक  परिवहन सुविधांचा विकास करण्यासाठी राबविण्यात येणार्‍या विविध प्रकल्पांमुळे आणि सुसुत्र नियोजनामुळे मुंबई महानगर क्षेत्रामध्ये कोणत्याही दोन टोकांमध्ये प्रवास  करणे आता अतिशय सुलभ होणार आहे, असेही मुख्यमंत्री अखेरीस म्हणाले.