Breaking News

भारतीय चित्रपटसृष्टी उदारमतवादी नाही - पूजा भट

पुणे, दि. 11, सप्टेंबर - भारतीय चित्रपटसृष्टी ही पारंपारिक विचारधारांनी अद्यापही बांधली गेली आहे. वेगळा विषय, वेगळ्या पद्धतीने मांडला तरी अजूनही तो  चित्रपटसृष्टीला रुचत नाही. याचा अनुभव अनेकदा आला त्यामुळे आपली भारतीय चित्रपटसृष्टी ही आपल्याला बाहेरून वाटते तितकी उदारमतवादी नाही, असे  प्रतिपादन अभिनेत्री पूजा भट यांनी शनिवारी केले. 
पाचव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टीव्हलच्या दुसर्‍या दिवशीच्या व्हॉईस ऑफ वुमेन इन द मुव्हीज - सप्रेस्ड ऑर हर्ड या विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या.  यावेळी अभिनेत्री दिव्या दत्ता, कीर्ती कुल्हारी आणि दिग्दर्शक अश्‍विनी अय्यर- तिवारी यांच्याशी प्रियांका सिन्हा यांनी संवाद साधला. बॉलीवूड हे खूप पारंपारिक  असून त्यात काळानुसार बदल घडविणे ही काळाची गरज आहे. आज विषयानुरूप आणि समाजाच्या सद्यस्थितीवर भाष्य करणार्‍या चित्रपटांची संख्या वाढणे  आवश्यक आहे. शंभर कोटींचा व्यवसाय करणारा चित्रपट हाच यशस्वी ठरतो असे नाही, तर कथा असलेला पण कमी बजेटचा चित्रपटही यशस्वी होऊशकतो याची  अनेक उदाहरणे आपल्याला पहायला मिळतील, असेही भट यांनी यावेळी नमूद केले.