Breaking News

डॉ. मेधा खोले यांनी स्वयंपाकीण महिलेवरील तक्रार अर्ज घेतला मागे

पुणे, दि. 11, सप्टेंबर - सोवळे मोडले प्रकरणात हवामान विभागाच्या संचालिका डॉ. मेधा खोले यांनी स्वयंपाकीण महिला निर्मला यादव यांच्यावर दाखल केलेला  तक्रार अर्ज शनिवारी मागे घेतला. समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा कोणताही उद्देश्य नव्हता. यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर  त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते, असे त्यांनी त्यांच्या अर्जात म्हटले आहे. मात्र, त्या महिलेने खोटी माहिती दिल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. डॉ. खोले यांनी स्वत:  सिंहगड पोलीस ठाण्यात उपस्थित राहून तक्रार अर्ज मागे घेतल्याचा अर्ज सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजीराव पवार आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन  खोडदे यांच्याकडे दिला. डॉ. पवार यांनी याविषयी माहिती दिली. 
माझा समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा कोणताही उद्देश्य नव्हता. संबंधित स्वयंपाकीण बाईंनी मला खरे सांगितले नाही, त्यामुळे त्यांचे आणि माझे वाद झाले.  त्या महिलेने उलट उत्तरे दिली. त्यामुळे फसवणुकीबाबतचा तक्रार अर्ज दिला होता. मात्र यामुळे समाज भावना दुखावली असेल तर मी त्याची दिलगिरी व्यक्त करते,  असे खोले यांनी दिलेल्या तक्रार मागे घेतल्याच्या अर्जात म्हटले आहे. यापुढे माझी त्या महिलेविषयी कोणतीही तक्रार असणार नाही, असेही या अर्जात नमूद केले  आहे. मात्र हे सांगताना स्वयंपाकीण महिलेने आपल्याला खोटे आडनाव सांगितल्याची खंतही डॉ. खोले यांनी व्यक्त केली. त्यावरून त्यांची फसवणूक झाल्याची भावना  किती तीव्र आहे, हे देखील लक्षात येते.
डॉ. खोले यांच्या घरी असलेल्या धार्मिक विधींना लागणार्‍या स्वयंपाकीण बाई ब्राह्मण असाव्यात, अशी त्यांची अपेक्षा होती. त्याप्रमाणे निर्मला कुलकर्णी असे खोटे  आडनाव सांगून धायरी येथील निर्मला यादव यांनी डॉ. खोले यांच्या घरी धार्मिक विधींचा स्वयंपाक केला. मात्र त्या कुलकर्णी नसून यादव आणि तेही मराठा  असल्याचे लक्षात आल्याने डॉ. खोले चिडल्या आणि त्यावेळी त्यांनी स्वयंपाकीण बाईंना त्यांच्या धायरी येथील घरी जाऊन त्याचा जाब विचारला. मात्र त्यावेळी  त्यांच्यात वाद झाले. अशाप्रकारे फसवणूक झाल्याने डॉ. खोले यांनी संबंधित स्वयंपाकीण महिलेविरुद्ध गुरूवारी सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र या घटनेचे  पडसाद समाजात उमटले. डॉ. खोले यांनी जातीयवाद केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. तसेच या प्रकरणात यादव यांच्यावर नव्हे तर डॉ. खोले  यांच्यावरच गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. डॉ. खोले यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानासमोरही आंदोलन करण्यात आले.