Breaking News

अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई न केल्यास संबंधित प्राधिकरण जबाबदार : आयुक्त

नवी मुंबई, दि. 13, सप्टेंबर - न्यायालयाचे व शासनाचे आदेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांवर विहित मुदतीत कारवाई न केल्यास याबाबतची सर्वस्वी जबाबदारी  संबंधित प्राधिकरणाची राहील, असे निर्देश महापालिका आयुक्त तथा समिती अध्यक्ष डॉ. रामास्वामी एन. यांनी नुकतेच एका बैठकीत दिले.
सिडकोकडील 312 व एम.आय.डी.सी. कडील 100 अनधिकृत धार्मिक स्थळांवर पोलिस बंदोबस्त मिळाल्यानंतर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश महापालिका  आयुक्त रामास्वामी यांनी नुकतेच एका बैठकीत दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. शासकीय कार्यालये/पोलीस स्टेशन  मधील अनधिकृत धार्मिक स्थळांवर महानगरपालिका विभाग कार्यालयांकडील यंत्रसामुग्री घेऊन निष्कासन कारवाई करण्यात येणार आहे. यावेळी सिडकोच्या  जागेवरील नव्याने केलेल्या सर्व्हेक्षणात आढळून आलेल्या 65 धार्मिक स्थळांवर 1 महिन्याच्या कालावधीत हरकती/सूचना मागविण्याबाबत यावेळी विचारविनीमय  करण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील 501 अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई होणार असून त्यामध्ये सिडकोच्या जागेवर तब्बल 377 अनधिकृत  धार्मिक स्थळे बांधण्यात आलेली आहेत. शासनाच्या आदेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याची अंतिम मुदत दि. 17 नोव्हेंबर 2017 पर्यंत आहे.  या बैठकीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील प्राधिकरणाकडील सदयस्थितीमध्ये महापालिकेच्या जागेवर 14, सिडकोच्या जागेवर 312 व याशिवाय नव्याने  केलेल्या सर्व्हेक्षणात आढळून आलेली 65 अशी एकुण 377, एम.आय.डी.सी.च्या जागेवर 100, वन विभागाच्या जागेवर 7, वन विभागाचे (कांदळवन कक्ष) 1,  रेल्वेच्या जागेवरील 2 अशी एकूण 501 अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत चर्चा करण्यात आली.