Breaking News

रत्नागिरी जिल्ह्यात पूर्णगडजवळ समुद्रात चौघेजण बुडाले

रत्नागिरी, दि. 13, सप्टेंबर - रत्नागिरीजवळच्या पूर्णगड समुद्रात घडलेल्या दुर्घटनेमध्ये चौघे जण बुडाले आहेत. पूर्णगड गावचे एकाच कुटुंबातील तिघे रहिवासी  जैनुद्दीन लतिफ पठाण (वय 45) यांच्या मालकीची बोट घेऊन ते स्वतः तसेच हसन लतीफ पठाण (वय 65) आणि अब्बास लतीफ पठाण (वय 42) हे त्यांचे दोघे  भाऊ आणि तवकर अब्दुल सत्तार बांगी (वय 32) हे चौघेही काल (दि. 11 सप्टेंबर) दुपारी दोन वाजता मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेले होते. रात्री दीड ते  पावणेदोन वाजण्याच्या सुमारास समुद्रात मासेमारी करत असताना पूर्णगड खाडी व समुद्राच्या दरम्यान मोठ्या लाटेमध्ये त्यांची नौका उलटली आणि चौघेही समुद्रात  बुडाले. त्यापैकी हसन आणि जैनुदीन लतीफ पठाण या दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. गावखडीचे रहिवासी वसंत नाटेकर यांनी समुद्रातील जैनुद्दीन पठाण यांचा  मृतदेह शोधून काढला, तर जयदीप तोडणकर व आबास बंदरकर यांनी समुद्रात बुडालेली बोट शोधून काढून किनार्‍यावर आणली. सकाळपर्यंत दोन मृतदेह मिळाले.  बाकीच्या दोन मृतदेहांचा तपास सुरू आहे.घटनास्थळी पोलीस बोट व कोस्ट गार्डची बोटीने तपास सुरू आहे. रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे,  पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव व महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. त्यांनी मदतकार्य सुरू केले आहे.  पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे पीएसआय एन. डी. उंडे पोलीस हवालदार पालांडे, पोलीस हवालदार व्ही. जी. गमरे, पोलीस नाईक आर. ए. कांबळे, पोलीस नाईक  महेश गुरव व चालक पोलीस हवालदार सावंत, पो. फौजदार कुबडे उपस्थित होते.