Breaking News

सर्व तालुक्यात काँग्रेसच्या अध्यक्षाच्या निवडणुका

औरंगाबाद, दि. 14, सप्टेंबर - अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे राज्यातील सर्व तालुके व गटांमध्ये निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे  या महिनाअखेरपर्यंत सर्व तालुकाध्यक्षांची अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. त्यानंतर दिवाळीपर्यंत जिल्हाध्यक्षाची निवड होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या अंतर्गत  पदाधिकारी नियुक्ती आचारसंहितेनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील पदाधिकारी निवडीची प्रक्रिया दोन महिन्यांपूर्वी राबविणे सुरू झाले. झारखंड येथील काँग्रेस नेते संतोष  सिंह यांना जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. सिंह यांनी नऊ पैकी पाच तालुक्यांत जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आणि मते जाणून  घेतली. तालुका अध्यक्षपदासाठी अनेक दावेदार असताना काही तालुक्यांमधून एकाधिकारशाही वापरून नियुत्तया केल्याचा आरोप काही पदाधिकार्‍यांनी थेट प्रदेश  काँग्रेस आणि सिंह यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केला. हे प्रकरण वाढल्याने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने प्रसिद्धीपत्रक काढून औरंगाबाद जिल्ह्यातील एकही  तालुकाध्यक्षाची निवड अधिकृत झाली नसल्याचे कळविले. त्यामुळे गटतटातील वाद वाढले आहेत. दरम्यान, तालुका निवडणूक अधिकारी नियुक्त करून त्यांच्या  पाहणीनंतर निश्‍चित होणारी नावे केंद्रीय पातळीवर पाठविली जातील आणि तिथूनच तालुकाध्यक्षांची अधिकृत घोषणा होणार असल्याचे सांगण्यात आले. राज्यातील  सर्व तालुका निवडणूक अधिकार्‍यांची नियुक्ती प्रक्रिया प्रशासकीय अडचणीमुळे लांबली होती. मात्र आता अखिल भारतीय काँग्रेस समितीनेराज्यातील सर्व जिल्हे व  शहरी भागातील गट याठिकाणी निवडणूक अधिकारी नेमले आहेत. त्यामुळे महिनाखेर ही प्रक्रिया पूर्ण होऊन तालुकाध्यक्षांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.  तालुकाध्यक्षांच्या निवडीनंतर जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होईल. पुढच्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे  या पदावर नवीन व्यक्ती येणार की आमदार अब्दुल सत्तार कायम राहणार याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.