Breaking News

झाँज, टिपर्‍यांच्या निनादात राजूरला श्रीगणेशाचे विसर्जन

श्रीसमर्थ, रा.वि.पाटणकर, मधुकर पिचड विद्यालयांचा सहभाग

अकोले, दि. 01, सप्टेंबर - आज गौरी व शिक्षण संस्थांच्या श्री गणेशाचे  गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जल्लोषात विसर्जन करण्यात आले. अकोले  तालुक्यातील अकोले, राजूर येथील रा. वि पाटणकर, स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक  विद्यालय मधुकर पिचड माध्यमिक विद्यालय, मधील विद्यार्थ्यानी  ढोल लेजीम  ताशा, झाँज, टिपर्‍या, टाळ  मृदूंग व पारंपरिक वाद्या याच्या निनादात हिंदू मुस्लिम विद्यार्थ्यांनी ताल धरीत बाप्पांना पुढच्या वर्षी परत या म्हणत  भावपूर्ण निरोप दिला.
श्रीसमर्थ शाळेच्या प्रांगणातून सांस्कृतिक कार्यक्रम करीत विविध वेशभूषेत विद्यार्थी नटून थटून मिरवणुकीत सहभागी झाले होते. नऊ वारी साडी, फेटा, धोतर,  जाकीट घालून गणपती पुढे भगवा हातात घेऊन तालासुरात व पावसाच्या सरी अंगावर घेत पोवाडे भावगीते व घोषणा देत परिसर दुमदुमून सोडला होता.  विद्यार्थ्यांमध्ये मिनाज तांबोळी, बुशरा शेख, शिफा मणियार, आसिफ मणियार, रोहित काळे, परवेज शेख, अनिस तांबोळी, रोहन चव्हाण, ओम लहामगे, दानिश  तांबोळी, संघराज पगारे आदी विद्यार्थ्यांनी झाँज व ढोल वाजवीत उपस्थितांचे मने जिंकून घेतली.
यावेळी प्राचार्य लेंडे, प्राचार्य अशोक देशमुख, प्राचार्या सौ. मंजुषा काळे यांनी योग्य नियोजन करुन मिरवणूक शांततेत काढत सायंकाळी 4 वाजता गणेशाचे विसर्जन  करण्यात आले.
संताजी तरुण मंडळ, लक्ष्मी नारायण मंडळ, गुरुदत्त तरुण मंडळ यांनी विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट मिरवणुकीबद्दल सत्कार करीत प्रोत्साहन दिले.