Breaking News

शेतकरी केंद्रबिंदू मानूनच संस्थेने कार्य करावे : आ.चैनसुख संचेती

बुलडाणा, दि. 13, सप्टेंबर - सहकार क्षेत्रात एकमेकास सहाय्य करु अवघे धरु सुपंथ असे म्हटले जाते म्हणून जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सहकारी सोसायटीतील  सर्वांनी एकसंघ होवून शेतकर्‍यांच्या हितासाठी कायम एकत्र येवून केवळ शेतकरीच केंद्रबिंदू मानून कार्य करावे, असे प्रतिपादन मलकापूर विधानसभेचे आमदार चैनसुख  संचेती यांनी संस्थेच्या जिल्हा कार्यालयाला दि.11 सप्टेंबर रोजी सदिच्छा भेट दिली यावेळी केले. 
या संस्थेच्या छोट्याखानी सत्कार समारंभाला आमदार चैनसुख संचेती, जि.प.अध्यक्ष यांचे पती शिवचंद्र तायडे, माजी नगराध्यक्ष गोकुळ शर्मा, खविसंचे अध्यक्ष  नंदूभाऊ खडके, डॉ.निकम, मराठी पत्रकार संघाचे विभागीय सचिव राजेंद्र काळे, पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे, संघाचे प्रसारक नानाजी कुळकर्णी, संस्थेचे नवनिर्वाचित  अध्यक्ष नारायणराव सुसर पाटील, उपाध्यक्ष पुष्पताई पाटील, अविनाश पाटील, प्रा.सुदेश पाटील, मनीष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे नवनिर्वाचित  अध्यक्ष सुसर पाटील यांनी संस्थेची पूर्ण माहिती सांगितली. यावेळी ते म्हणाले की, ही संस्था सर्व तालुका खरेदी विक्री संस्थांची जननी संस्था आहे. या संस्थेद्वारे  अनेक उपक्रम शेतकर्‍यांच्या हितासाठी योग्य पद्धतीने राबवून यशस्वी केलेले आहेत. अजूनही पेट्रोलपंप, अ‍ॅरो प्लँट, स्टोअर, गोडावून हे सर्व उपक्रम संस्थाच्या  उत्पन्नात वाढ करणारे असून यामध्ये संस्थेच्या सर्व संचालक मंडळ, कर्मचारी मिळून सर्वांना सोबत घेवून एकजुटीने काम करु, अशी ग्वाही दिली. तर या संस्थेला  शासनाच्या विविध योजनांमध्ये, उपक्रमांमध्ये सहभागी करुन होईल तेवढी मदत करावी, संस्थेच्या विकासाभिमुख उपक्रमांचा विस्तार वाढविण्यासाठी, शेतकर्‍यांसाठी  काम करण्याची संधी द्यावी, अशी आग्रही मागणी केली.
यावेळी आमदार चैनसुख संचेती म्हणाले की, कोणतेही पद अलंकाराचे आभूषणे नसतात. ती एक जबाबदारी आणि काटेरी मुकूट, सतीचे वान आहे. सहकारी संस्थेत  एकानंतर दुसर्‍याच्या हाती सत्ता द्यायची असते. ही संस्था फार जुनी असून या संस्थेला जुना इतिहास आहे. सहकार क्षेत्राचे जे मातब्बर आणि ज्यांची ख्याती सहकार  महर्षी म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले स्व.माजी आमदार भास्कररावजी शिंगणे असो की विद्यमान माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे व सहकार क्षेत्रात काम  करणारे शिवाजीराव पाटील असो या सर्वांनी संस्थेला उर्जित अवस्थेत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले परंतु अवसायकांनी आपल्या परीने या संस्थेला अनेक  अडचणी निर्माण करण्याचे संस्थेला संपुष्टात आणण्याचे काम केले. म्हणून या ठिकाणी एवढेच म्हणेल आज ही जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणून उत्तम,  अतिउत्तम असा काम करण्याचा आलेख वाढवावा. संस्थेच्या हिताचा निर्णय घेवून सर्व सहकार्‍यांनी काम करावे. त्यांच्या नेहमीच्या स्टाइलमध्ये त्यांनी शायरी म्हणून  “बेहत्तर की बेहत्तर तलाश कर, नदी मिल गयी तो समंदर की तलाश कर, यु तो शिशा टुटता है, फत्तर की चोट से, पर पत्थर टुट जाये एैसा शिशा तलाश कर.’’  अशा शायरीतून संस्थेचा पुढील येणारा दिवस सोन्याचा ठरो आणि जी होईल, शक्य असेल ती मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करेन, तुमच्या विकासाच्या  मुद्यावर आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत, अशा शब्दात भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.   कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापक कमलेश आवारे,  रविंद्र हिवाळे, रवी काटे, एम.एस.पटोकार, रामेश्‍वर शिंगणे, निलेश अल्हाट, शेख शगीर शेख नजीर, समाधान वाघ, गणेश सनान्से, इंगळे, जुमडे यांनी परिश्रम  घेतले.