Breaking News

इंधन भेसळप्रकरणी सांगली जिल्ह्यातील मातोश्री पेट्रोल पंप सील

सांगली, दि. 27, सप्टेंबर - विहित मर्यादेपेक्षा इंधनाचा नियमबाह्य अतिरिक्त साठा व इंधनात भेसळ केल्याप्रकरणी सांगली- इस्लामपूर बायपास रस्त्यावरील मातोश्री  पेट्रोल पंप जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांच्या पथकाने सील केला. या पेट्रोल पंपचालकावर जीवनावश्यक वस्तू नियंत्रण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. 
बायपास रस्त्यावरील या मातोश्री पेट्रोल पंपाबाबत विजयकुमार काळम- पाटील यांच्याकडे तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीची तात्काळ गांभीर्याने दखल घेत  विजयकुमार काळम- पाटील यांनी स्वतः याची खात्री करून घेत हा पेट्रोल पंप सील केला. विजयकुमार काळम- पाटील यांच्यासह पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे,  अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, सांगली जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, पोलीस उपअधिक्षक  डॉ. श्रीमती दीपाली काळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले, वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक राजेंद्र टाळकुटे व किशोर चोरडीया यांच्या पथकाने ही  धडक कारवाई केली. या कारवाईत भारत पेट्रोलियमचे विक्री अधिकारी जोसेफ साजन यांच्यासह पोलीस व पुरवठा विभागाकडील अन्य अधिकारी व कर्मचारीही  सहभागी झाले होते.
हा पेट्रोल पंप महेंद्र भालेराव यांनी महिन्यापूर्वीच भाडेकराराने चालविण्यास घेतलेला आहे. या पेट्रोल पंपाबाबत तक्रार आल्यानेच विजयकुमार काळम- पाटील यांनी  धडक कारवाई केल्याचे सांगण्यात आले. या कारवाईत दत्तात्रय शिंदे यांचाही थेट सहभाग होता. या दोघा वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागाच्या  अधिकार्यांनी तब्बल पाच तास या पेट्रोल पंपाची तपासणी केली. त्यात पेट्रोल पंपाच्या टाकीत इंधनाचा विहीत मर्यादेपेक्षा जादा साठा आढळून आला. त्यातून इंधनात  भेसळ होत असल्याचे स्पष्ट झाले. या इंधनाचा रंगही काळसरच होता. याशिवाय इंधनाच्या घनतेची नोंद सकाळी दहा वाजण्यापूर्वी करणे आवश्यक असते. मात्र त्याची  नोंद घेण्यात आलेली नव्हती. स्टॉक रजिस्टरवर दि. 24 सप्टेंबर रोजी अखेरची नोंद झालेली आढळली.
वैधमापन शास्त्र यंत्रणेकडून पेट्रोल पंपाचे सील तोडल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात येेणार आहे. भारत पेट्रोलियम या  कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी यांनी साठ्यातील तफावत नियमापेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट केले. या टाकीमधील इंधनाच्या अतिरिक्त साठ्याबाबत पेट्रोल पंप  व्यवस्थापनाला समाधानकारक खुलासा करता आला नाही. इंधनाच्या टाकीनजीक काळसर डाग आढळले आहेत. वास्तविक, शुध्द इंधनाचे अशा पध्दतीचे डाग  आढळत नाहीत. त्यामुळे इंधनात अन्य कोणती रसायने आहेत का? याची तपासणी करण्यासाठी या इंधनाचे नमुने घेण्यात आले आहेत.