Breaking News

काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार बरे होते- राजू शेट्टी

सांगली, दि. 27, सप्टेंबर - तत्कालीन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शासनाच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळूनच जनतेने देश व राज्यात परिवर्तन केले. मात्र गत  साडे तीन वर्षात केंद्र व राज्यातील या नव्या सरकारचा कारभार पाहता आधीचे सरकारच बरे होते, असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे, असे प्रतिपादन  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केले. 
सांगली जिल्हा स्थापत्य अभियंता संघटनेच्यावतीने अभियंता दिनानिमित्त विश्रामबाग येथील राजमती भवन येथे आयोजित कार्यक्रमात राजू शेट्टी बोलत होते. या  कार्यक्रमास आमदार बच्चू कडू, स्थापत्य अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष दिलीप येडगे, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले, सार्वजनिक  बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र जाधव, मिरज पश्‍चिम विभागाचे कार्यकारी अभियंता पृथ्वीराज चव्हाण, सांगली महापालिकेचे कार्यकारी अभियंता आर.  आर. पाटील व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सांगली लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष इंद्रजित साळुंखे उपस्थित होते.
आजपर्यंत शेतकर्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठीच आंदोलने केली. आता पदवीधर अभियंत्यांच्या प्रश्‍नांसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. केंद्र शासनाने  वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणाली लागू केली. पण, याचा नेमका घोळ अद्यापही कोणाला समजलेला नाही. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास  पोहोचविण्याचे धोरण असल्याचा दावा केंद्र शासन करीत आहे. मात्र नेमका विकास कोठे राहिला आहे, हेच सापडेनासे झाले आहे. या सरकारचा विकास केवळ  पहिल्या रांगेतील धनदांडग्या उद्योगपतींसाठीच आहे. आता केंद्र व राज्यात लवकरच परिवर्तनाची संधी मिळणार आहे. त्यासाठी स्थापत्य अभियंत्यांनी एकजुटीने उभे  राहूया, असेही टीकाही राजू शेट्टी यांनी सांगितले.
बच्चू कडू म्हणाले, की वस्तू व सेवा कर प्रणालीमुळे गत अडीच महिने काम बंद करून स्थापत्य अभियंते गांधीगिरी मार्गाने आंदोलन करीत आहेत. मात्र आता  तुमच्यावर भगतसिंगगिरी करण्याची वेळ आली आहे. तुम्ही आधी पदवीधर मतदारसंघासाठी मतदान करीत नव्हता. मात्र आता याच मतदारसंघाचे उमेदवार असलेल्या  चंद्रकांत पाटील यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे, असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमात स्थापत्य अभियंता संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी व गुणवंत  अभियंत्यांचा राजू शेट्टी व बच्चू कडू यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजन महावीर पाटील, हिंमत कोळी, प्रवीण कोले, अतुल बेले, पृथ्वीराज  पवार, जयराज बर्गे व हेमंत मोरे आदींनी केले होते.