Breaking News

युवकांनी पुढार्‍यांच्या मागे धावू नये - न्यायमुर्ती बी. जी. कोळसे-पाटील

पुणे, दि. 28, सप्टेंबर - सरकार तुम्हाला आंदोलन करायला सांगेल, मात्र या आंदोलनात दलित आणि मागसवर्गीय असे मुद्दे घालून त्याला वेगळे वळण देण्याचा  प्रयत्न हे सरकार करत आहे. त्यामुळे आता तरी सगळ्यांनी एक व्हावे. युवकांनी पुढार्‍यांच्या मागे धावू नये असे आवाहन न्यायमुर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी  युवकांना केले. आम्हाला कोणते आरक्षण नकोय, राजकीय तर मुळीच नकोय. मात्र, केजी टू पीजी शिक्षण मोफत मिळायला हवे, असेही कोळसे-पाटील यांनी  सांगितले. 
सकल मराठा बहुजन समाजाच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरात मराठा अस्मिता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ  सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. पुरुषोत्तम खेडेकर, डॉ. भारत पाटणकर, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे,  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, टेक्सास गायकवाड, गेल ऑमवेट, डॉ. भारत पाटणकर, निर्मला यादव, राहुल पोकळे, अभिषेक देशपांडे, अश्‍विनी  सातव-भिडे, आत्माराम शास्त्री जाधव उपस्थित होते.
आपल्या देशात आर्थिक, सामाजिक विषमता पाहण्यास मिळते. आज लोकप्रतिनिधी स्वत:चाच विचार करत आहेत. देश हागणदारी मुक्त करणार असे देशाचे पंतप्रधान  म्हणतात परंतू, जे साफ-सफाईचे काम करतात त्यांच्या समस्या कधी सोडवणार असा प्रश्‍न उपस्थित केला. मनूस्मृती कायदे हे केवळ कागदावरच बंद आहेत.  प्रत्यक्षात अपण समाजजीवनात त्याचा वापर करीत आहोत. त्यामुळे काही गोष्टी आपण स्वत:पासून पाळल्या पाहिजेत, असे ऍड. पुरूषोत्तम खेडेकर यांनी सांगितले.  सोळवे प्रकरणामुळे मला खूप दुःख झाले. तुम्ही सर्व मागे उभे राहिल्याने एक समाधान वाटत आहे. मात्र, मेधा खोले यांच्याकडे तीनवेळा काम केले. त्यांनी कामाचे  पैसे देखील दिले नसल्याचा खुलासा निर्मला यादव यांनी मनोगत व्यक्त करताना केला. धार्मिक विधी, लग्न समारंभ, पित्र अशा कर्मकांडाला ब्राम्हण्यवादाचा पगडा  असलेल्या पुरोहितांचा वापर करु नका... स्त्रियांना समानतेची वागणूक द्या...राजकीय छत्राखाली पोसले जाणारी जातीयता फेकून द्या...मराठा जातीअंतर्गत असलेली  राजे, जाहगिरदार, इनामदार, देशमुख अशी श्रेष्ठत्वाची उतरण झुगारुन द्या...आपल्या घरापासून याची सुरुवात करा अशी घोषणाबाजी या परिषदेत करण्यात आली.
राणे कमिटी बोगस - बी. जी. कोळसे
मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या राणे कमिटीला आरक्षणासंदर्भात काहीही समजत नाही. कोण राणे आणि कुठली त्यांची कमिटी. कुठंही कोणत्याही पक्षात  जाऊन बसतात. तिथेही त्यांना कोण विचारत नाही. राणे बोगस आहेत आणि त्यांची कमिटीही बोगस आहे. अशा शब्दांत राणेवर बी. जी. कोळसे पाटील यांनी टीका  केली.