Breaking News

उद्धव ठाकरेंचा गजनी झाला आहे - राधाकृष्ण विखे पाटील

पुणे, दि. 28, सप्टेंबर - महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिवसेना हा विनोद झालेला आहे. सत्तेत सहभागी होण्यापुर्वी मराठवाड्याला 55 हजार कोटी द्या, आम्ही  कर्जमाफी मागीतली तर कर्जामाफी नको कर्जमुक्ती द्या अशी मागणी शिवसेनेने केली होती. आता ते जे बोलतात आणि पुर्वी ते जे बोलायचे यातील फरक म्हणजे  अमिर खानला गजनी सिनेमात जसे फोटो बघुन स्मृती यायची तशीच अवस्था आज त्यांनी झाली आहे, असे सांगत उद्धव ठाकरेंचा गजनी’ झाला आहे अशी टिका  विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी केली. 
शहरात एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे या प्रसंगी उपस्थित होते. नारायण राणेंच्या पक्ष  सोडण्याबद्दल विचारले असता राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, त्यांनी पक्ष सोडू नये असे आम्हाला वाटत होते, त्यांचा निर्णय, भुमीका योग्य की अयोग्य याचे  मुल्यमापण त्यांनीच करायला हवे मी त्या विषयी बोलणार नाही, नितेश राणेंनी विरोधी पक्ष नेतेपदाविषयी जे भाष्य केले आहे त्याला मी फार महत्व देत नाही, मी  कोणत्याही पदासाठी नाही, मी पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडत आहे, त्यांचा रिमोट कंट्रोल कुणाकडे हे त्यांनाच माहित नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी  लगावला.
कर्जमाफीची घोषणा म्हणजे फडणवीस सरकारने शेतकर्‍यांची फसवणुक असल्याचे सांगताना विखे पाटील म्हणाले, शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर सरकारने झोपेचे सोंग घेतलेले  आहे, कर्जमाफीसाठी नियम व अटी लावुन सरकारने सामान्य शेतकर्‍यांच्या जखमेवर मिठ चोळले आहे, कधी मर्यादा बदलतात, अटी बदलतात नेमके काय चालले  आहे हे भाजपच्या मंत्र्यांनाही माहित नाही. शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळावी अशी एकाही मंत्र्याची भावना असल्याचे दिसत नाही. कर्जमाफी मध्ये काही त्रुटी असतील  तर त्या प्रशासनाने दुर करायला हव्यात मात्र तसे होताना दिसत नाही.
राज्य आणि केंद्र सरकार सामान्य जनतेची लुट करत असल्यची टिका करताना विखे पाटील म्हणाले, अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 2014 च्या तुलनेत आज निम्याहुन  अधिक कमी दराने पेट्रोल मिळत आहे, मात्र केंद्र आणि राज्यसरकार त्यावर लाखो कोटींचा नफा मिळवत आपल्या तिजोरीत भरत आहे. दुष्काळासाठी लावलेला 11  रूपये सेस कमी करावा अशी आमची मागणी आहे परंतु सरकार सामान्य जनतेला दिलासा देण्यास इच्छुक नसल्याचेही त्यांनी नमुद केले.