Breaking News

मिरजेत 20 लाख रूपये किंमतीचा गुटखा व गुटख्याचे साहित्य जप्त

सांगली, दि. 28, सप्टेंबर - मिरज शहरात अवैधरित्या विक्रीसाठी आणलेला सुमारे 20 लाख रूपये किंमतीचा गुटखा, सुगंधी सुपारी व गुटख्याचे साहित्य बुधवारी  पहाटे जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व सांगली जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. या  गुटखा तस्करीप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून त्याच्यावर मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
अटक केलेल्यात भरतेश सिद्राम कुडचे (वय 33, रा. नदी वेस, वैरण बाजार परिसर, मिरज) याचा समावेश आहे. मिरज शहरात काही दिवसापासून सुरू असलेल्या  पटेल- जमादार या वादातूनच हे गुटखा तस्करीचे प्रकरण उघडकीस आल्याची चर्चा आहे. यापूर्वीही भरतेश कुडचे याच्यावर अशाच पध्दतीने गुटखा तस्करी  केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे. भरतेश कुडचे हा गुटखा निर्मितीप्रकरणी गुन्हा दाखल असलेला ङ्गारूक जमादार याचा हस्तक असल्याचे समजते.
वैरण बाजार परिसरातील नदी वेस येथे भरतेश कुडचे याने बांधलेल्या नवीन घरात मोठ्याप्रमाणात बंदी असलेल्या विमल कंपनीचा गुटख्याचा साठा असल्याची  माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती. या माहितीआधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिस पथकाने अन्न व औषध प्रशासनाच्या  सहाय्याने भरतेश कुडचे याच्या घरी पहाटेच्या सुमारास छापा टाकला. त्यात विमल कंपनीचा गुटखा, सुगंधी सुपारी व गुटख्याचे साहित्य असा एकूण 20 लाख 12  हजार रूपये किंमतीचा माल मिळून आला.