Breaking News

अशोक चव्हाणांनी सतत अन्याय केला - नारायण राणे

मुंबई / कुडाळ, दि. 22, सप्टेंबर - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपल्यावर सातत्याने अन्याय केला . हा अन्याय किती दिवस सहन करायचा ?  त्यामुळेच आपण काँग्रेस मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला , असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी  कुडाळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत  आणि कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केले . 
पत्रकार परिषद आणि कार्यकर्ता मेळावा अशा दोन्ही ठिकाणी राणे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडले . या वेळी त्यांनी आपण 2005 मध्ये शिवसेनेतून  बाहेर पडत काँग्रेसमध्ये कसे आलो याचा प्रवास कथन केला. ते म्हणाले की , अहमद पटेल , त्यावेळच्या प्रदेश अध्यक्ष प्रभा राव , प्रभारी मार्गारेट अल्वा आणि  बाळासाहेब विखे पाटील यांनी आपल्याला शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे आमंत्रण दिले होते . अहमद पटेल यांनी तर आपल्याला सहा महिन्यात  मुख्यमंत्री करतो असे आश्‍वासन दिले होते . मात्र त्यांनी हे आश्‍वासन पाळले नाही . पुढे दोन तीन वेळेस मुख्यमंत्री बदलण्याची वेळ आली त्यावेळीही पक्ष नेतृत्वाने  आपल्याला डावलले , असा आरोप त्यांनी केला .
आपण पक्षाकडे काहीच मागितलेले नव्हते . विधान परिषद सदस्यत्वासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या नावाचा आग्रह धरला . मात्र त्यावेळी अशोक  चव्हाण यांनी माझया नावाला विरोध केला . राणे सोडून कोणालाही घ्या असे अशोक चव्हाणांनी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींना सांगितले होते . विधान परिषदेवर आल्यावर  काँग्रेसचे गट नेते म्हणून माझी नियुक्ती होणे अपेक्षित होते . मात्र चव्हाण यांनी त्यावेळी शरद रणपिसे यांची गटनेते म्हणून नियुक्ती केली . अशाच पद्धतीने पक्षात  वारंवार अपमान होणार असेल तर या पक्षात राहण्यात काहीच अर्थ नाही, असेही त्यांनी नमूद केले.  काँग्रेसची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याच्या  प्रदेश समितीच्या निर्णयावरही राणे यांनी जोरदार टीका केली. या पुढील काळात आपण काँग्रेस आणि शिवसेनेला ’रिकामे ’करणार आहोत अशा सूचक शब्दांत त्यांनी  आपल्या पुढील वाटचालीचे संकेत दिले.  गेल्या अनेक दिवसांपासून राणे हे काँग्रेस पक्षाबाहेर पडणार असल्याची चर्चा होती . आज या चर्चेला पूर्णविराम मिळाला.