Breaking News

कोयना ओव्हर फ्लो; विर्सग सुरू

सातारा, दि. 22, सप्टेंबर - धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात 35 हजार 734 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक होत आहे.  त्यामुळे आजच्या घडीला 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण ओव्हरफ्लो झाले आहे. सध्या धरणात 104.70  टीएमसी एवढा पाणीसाठा झाल्याने कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे बुधवारी सकाळी  दीड फुटाने उचलून 14 हजार 10 व पायथा वीजगृहातून 2 हजार 100 असे  मिळून एकूण 16 हजार 110 क्युसेक्स प्रतिसेंकद पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळी मोठी वाढ झाली  असून महसूल विभाग व पाटण नगरपंचायतीकडून कोयना नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कोयना धरणातील पाणीसाठ्याने शंभरी ओलांडली होती. त्यावेळी शिवसागर जलाशयात 101.67 टीएमसी पाणीसाठा  झाला होता. तद्नंतर गेल्या पंधरा दिवसांपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पावसाने पूर्णपणे विश्रांती दिली होती. त्यामुळे  परतीच्या पावसाकडे  सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. गेल्या पंधरा दिवसात कडक उन्ह पडल्याने पाऊस पडेल की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली होती. अखेर हवामान खात्याच्या  अंदाजानुसार सोमवार दि. 18 रोजी दुपारपासून पुन्हा जोरदार पावसाने आगमन केले. हा पाऊस सलग तीन दिवस पडत राहिल्याने अगोदरच काठोकाठ भरलेले  कोयना धरण ओव्हरफ्लो झाले. धरण क्षेत्रामध्ये पावसाची बरसात कायम असल्याने जलाशयातील पाण्याची आवकही मोठ्याप्रमाणात सुरू झाल्याने पाणीसाठ्यावर  नियंत्रण ठेवण्यासाठी कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे बुधवार दि. 20 रोजी सकाळी 9 वाजता 1 फुटाने व पुन्हा दुपारी 3.30 वाजता अर्ध्या फूट असे एकूण दीड  फुटाने उचलून कोयना नदीपात्रात 14 हजार 10 व पायथा वीजगृहातून 2 हजार 100 असे मिळून एकूण 16 हजार 110 क्युसेक्स प्रतिसेंकद पाण्याचा विसर्ग  कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. सध्या कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले असून महाराष्ट्रावरील  विजेचा व सिंचनाचा प्रश्‍न कायमस्वरूपी मिटला आहे.
गेल्या चोवीस तासात कोयनानगर येथे 98 (4424), नवजा 159 (5330), महाबळेश्‍वर 141 (4469) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर शिवसागर  जलाशयात 35 हजार 734 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक होत आहे. धरणाची पाणीपातळी 2163.1 फूट व 658.308 मीटर झाली असून धरणातील  पाणीसाठा 104.70 टीएमसी इतका झाला आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून पाटण तालुक्यात पडत असलेल्या संततधार जारेदार अतिवृष्टीमुळे व कोयना  धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे खरीप हंगामात जोमाने आलेली पिके कुजली आहेत. तर कोयना, केरा, काजळी काफना, मोरणा, वांग-मराठवाडी आदी  नद्यांना पूर आला आहे. निसरे येथील जुना पूलही पाण्याखाली गेला आहे. कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ  झाली आहे. कोयना नदीकाठावरील गावांना तसेच नदीपात्रात न जाण्याबाबत ध्वनीक्षेपकाद्वारे सतर्कदेचा इशारा देण्यात आला आहे.