Breaking News

मलकापुरात लवकरच नगर पालिका

सातारा, दि. 22, सप्टेंबर - कराड तालुक्यात कराड शहरानंतर मलकापूरला सर्वांत मोठे शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात लवकरच नगरपालिका अस्तित्वात  येणार असून, येत्या काळात मलकापूर शहरावर भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी आणि मलकापूरचा नगराध्यक्ष भाजपचाच करण्यासाठी या शहरातील कार्यकर्त्यांनी  पक्षसंघटन मजबूत करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी केले. 
भाजपाच्या कराड तालुक्यातील विविध आघाड्यांच्या पदाधिकारी निवडीप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपाच्या मलकापूर शहराध्यक्षपदी सूरज शेवाळे, भारतीय  जनता युवा मोर्चाच्या मलकापूर शहराध्यक्षपदी तानाजी देशमुख, कराड तालुका उपाध्यक्षपदी संतोष पानस्कर व वैभव कणसे, सरचिटणीसपदी धनंजय साळुंखे आणि  ओबीसी आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी मनोज शिंदे यांची निवड करण्यात आली. डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते नूतन पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात  आली.
 डॉ. भोसले पुढे म्हणाले, विविध संस्थांच्या उभारणीमुळे मलकापूर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण वाढले आहे. राष्ट्रीय महामार्गालगत असणार्‍या या  शहराच्या विकासाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष असून, काही महिन्यांपूर्वी याठिकाणी झालेल्या सभेतही त्यांनी या शहराच्या विकासाला प्राधान्य  देण्याबाबत सुतोवाच केले होते. त्यामुळे येत्या काळात या शहरात भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मलकापूरचे नगरसेवक हणमंतराव जाधव, बाळासाहेब घाडगे, सुरेश खिलारे, कान्होजी लाखे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस आनंदराव शिंदे, संजय गांधी  निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष संजय पवार, पिनू जाधव, भाजपाचे तालुकाध्यक्ष विकास कदम, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष शंकर पाटील, अनुसूचित जाती-जमाती  आघाडी तालुकाध्यक्ष रामभाऊ सातपुते, भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस भूषण जगताप, तालुकाध्यक्ष पंकज पाटील, अतुल भोसले युवा प्रतिष्ठानचे कराड शहराध्यक्ष  उमेश शिंदे, अरूण यादव यांच्यासह  पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.