Breaking News

नारायण राणेंच्या पक्षत्यागानंतर काँग्रेसमध्ये राजीनाम्यांचे सत्र

रत्नागिरी, दि. 23, सप्टेंबर - काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आमदारकीसह काँग्रेस सदस्यत्वाचा दिलेल्या राजीनाम्याचे रत्नागिरी जिल्ह्यात  चांगलेच पडसाद उमटले. लांजा तालुक्यातील नेते आणि विधानसभेचे माजी उमेदवार राजन देसाई यांनी काल राजीनामा दिला, तर काँग्रेसचे राजापूर तालुकाध्यक्ष  रवींद्र नागरेकर यांच्यासह तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी आपापल्या पदांसह काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती श्री. नागरेकर  यांनी पत्रकार आज परिषदेत दिली. सदस्यत्वाचे राजीनामे प्रदेशस्तरावर पाठविण्यात येणार असून माजी खासदार डॉ. नीलेश राणे यांच्या तालुका दौर्यानंतर पुढील  राजकीय वाटचालीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. राणे यांनी काल आमदारकीसह काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांचे पुत्र माजी खासदार नीलेश राणे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या  राजीनाम्याचे पडसाद कोकणात उमटू लागले आहेत. त्यामध्ये राजापूर तालुक्याचाही समावेश आहे. श्री. राणे यांचा राजीनामा आणि तालुक्यातील पदाधिकारी आणि  कार्यकर्त्यांची भूमिका मांडण्यासाठी श्री. नागरेकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. श्री. राणे यांच्यासारख्या माजी मुख्यमंत्र्यांवर पक्षात अन्याय होऊन त्यांना  सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागत असेल तर, सर्व सर्वासामान्य कार्यकर्त्याची काय अवस्था होईल, असा प्रश्‍न उपस्थित करून श्री. नागरेकर म्हणाले की,  कोकणच्या विकासाला नवा आयाम देणारे श्री. राणे यांच्यावर झालेला अन्याय कधीही खपवून घेतला जाणार नाही. त्याच्या निषेधार्थ काँग्रेस सदस्यत्वाचा आपण  राजीनामा देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आपल्यासोबत तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते राजीनामा देत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट  केले.