Breaking News

जीएसटी रिटर्न भरण्यात अडचणी; तीव्र आंदोलनाचा पुणे मर्चंट्स चेंबरचा इशारा

पुणे, दि. 14, सप्टेंबर - केंद्र शासनाने लागू केलेल्या जीएसटी कर प्रणालीबाबत व्यापार्‍यांमध्ये प्रचंड संभ्रमावस्था आहे. जीएसटीचे रिटर्न भरण्यात मोठ्या अडचणी  येत आहेत. या नव्या कर प्रणालीबाबत व्यापार्‍यांना भेडसावणार्‍या समस्यांचे निराकरण न झाल्यास येत्या काही काळात जीएसटीच्या विरोधात आम्हाला तीव्र  आंदोलन करावे लागेल, असा इशारा पुणे मर्चटस् चेंबरच्या वतीने देण्यात आला आहे. 
जीएसटीबाबत जाणवणार्‍या अडचणी सांगण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यापार्‍यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. यावेळी  चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, उपाध्यक्ष जवाहरलाल बोथरा, माजी अध्यक्ष वालंचद संचेती आदी उपस्थित होते.
ओस्तवाल म्हणाले, व्यापारी कर भरायच्या विरोधात कधीच नव्हता. उलट देशभरात एकच कर लागू होणार म्हटल्यावर आम्हालाही हायसे वाटले होते. पण, आता ही  नवीन कर प्रणाली अत्यंत किचकट असल्याचे लक्षात येत आहे. प्रत्यक्षात महिन्यातून तीन रिटर्नस सादर करायचे आहेत, जे शक्य होत नाही. कारण ती पद्धत अत्यंत  किचकट आहे. त्याचबरोबर हे रिटर्नस ऑनलाइन भरायचे आहेत. अनेकदा ते ऑनलाइन भरले जात नाहीत. अनेकवेळा शासनाच्या वेबसाइटचे सर्व्हर डाऊन असते.  हे रिटर्नसा विलंब झाला, तर लगेच दंड आकारला जातो. तोसुध्दा 24 टक्के व्याज लावून आकारण्यात येतो. आज बँकामध्येसुध्दा ऐवढ्या मोठ्या प्रमाणावर व्याज  आकारले जात नाही. त्यामुळे सगळे व्यापारी या जीएसटी कर प्रणालीला वैतागले आहेत.
जीएसटी, आयजीएसटी किंवा सीजीएसटी कर भरताना टंकलेखनात काही चूक झाल्यास संपूर्ण कर भरावा लागेल, अशी तरतूद यामध्ये आहे. त्यामुळेसुध्दा अडचणी  येतात. एकदा ऑनलाइन अर्जामध्ये माहिती भरल्यावर त्यात काही बदल करता येत नाही. एखादी आकडेवारी चूकून भरली गेली, तर त्यात पुन्हा बदल करता येत  नाही, हे योग्य नाही. त्यात बदल करता आला पाहिजे. पण, ती तरतूद करण्यात आलेली नाही. याशिवाय जीएसटीमध्ये प्रत्येक बिल सिस्टिममध्ये अपलोड’ करणे  अपरिहार्य केले आहे. त्यामुळे व्यापारापेक्षा किचकट कारकुनी व इतर कामे वाढली आहेत.त्यामुळे यातसुध्दा शासनाने बदल करणे अपेक्षित आहे, असे बोथरा यांनी  सांगितले.