Breaking News

टंचाईग्रस्त गावांसाठीच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचा अहवाल शासनाकडे सादर

नाशिक,
२९ सप्टेंबर  :  येवला तालुक्यातील सतत टंचाईग्रस्त असणाऱ्या ४१ गावांसाठी नवीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना करण्याकरिता आ.छगन भुजबळ यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाने शासनाकडे पूर्व व्यवहार्यता अहवाल पाठविल्याची माहिती आ.जयवंतराव जाधव यांनी दिली आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम टप्पा-२ मधून सदर योजना हाती घेतली जाणार आहे.
संपूर्ण येवला तालुकाटँकरमुक्त करण्याचे छगन भुजबळ यांचे प्रयत्न आहेत. यासाठी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचेकडे येवल्यातील टंचाईग्रस्त ४१ गावांसाठी नवीन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तयार करण्याची मागणी आहे. विधिमंडळात तारांकित प्रश्न आणि लक्षवेधीद्वारे छगन भुजबळ व जयवंतराव जाधव यांनी या विषयाचा पाठपुरावा केला आहे.
येवला तालुक्यातील राजापूर, ममदापूर, रेंडाळे, अंगुलगांव, डोंगरगांव, देवदरी, खरवंडी, रहाडी, पिंपळखुटे तन्हाळसाठे, वाघाळे, आहेरवाडी, कोकणखुर्द, पांजरवाडी, जायदरे, हडपसावरगाव, वाईबोथी, खामगांव, देवठाण, गारखेडा, भुलेगाव, मातुलठाण, कौटखेडे, आडसुरेगाव, धामनगांव, लहित, गोरखनगर, वसंतनगर, चांदगाव, कोळम बु, कोळगाव, कुसमाडी, नायगव्हाण, तळवाडे, खिर्डीसाठे, महालगाव, घनमाळी मळा (नगरसूल), गणेशपूर, कासरखेडे, दुगलगांव, बोकटे ही ४१ गावे अवर्षणप्रवण क्षेत्रातील असून या गावांना शाश्वत पाणीपुरवठा योजना नाही. या गावांना सतत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
या ४१ गावांसाठी ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या धर्तीवर नांदूरमध्यमेश्वर एक्सप्रेस कॅनॉलवरून किंवा गोदावरी डाव्या कालव्यातून नवीन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तयार करण्याची भुजबळांची मागणी होती. सदर पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पूर्ण व्यवहार्यता अहवाल शासनाला पाठवणे आवश्यक होते. छगन भुजबळ व जयवंतराव जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम टप्पा-२ मधून ही प्रादेशिक योजना हाती घेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, नाशिक यांनी शासनास पूर्व व्यवहार्यता अहवाल सादर केला आहे. त्यामुळे येवल्यातील टंचाईग्रस्त असणाऱ्या ४१ गावांसाठी नवीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
येवला तालुक्यातील ३८ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही केवळ राज्यातील नव्हे तर देशातील पाणीपुरवठा योजनांसाठी पथदर्शी अशी योजना आहे. या योजनेला ३८ गावांव्यतिरिक्त आणखी ७ गावे जोडल्यामुळे तालुक्यातील ४५ गावांसाठी ही योजना जलसंजीवनी आहे. नाशिक जिल्ह्यात येवला तालुका हा सतत अवर्षणप्रवण असल्यामुळे जिल्हाभरात दरवर्षी येवल्यातील सर्वात जास्त गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. भुजबळांच्या कल्पनेतील ही योजना प्रत्यक्षात साकारल्यानंतर संपूर्ण येवला तालुका टँकरमुक्त होणार असल्याचे आ.जयवंतराव जाधव शेवटी यांनी म्हटले आहे.