Breaking News

आश्वासाने पूर्ण करण्याच्या दिशेने सत्ताधा-यांची पाऊले पडताना दिसत नाहीत - अजित पवार


पुणे  : महापालिका निवडणुकीत भाजपने भली मोठी आश्वासने दिली होती. खूप स्वप्न दाखविली होती. त्यामुळे जनतेने भाजपला एकहाती सत्ता दिली. मात्र, ती आश्वासाने पूर्ण करण्याच्या दिशेने सत्ताधा-यांची पाऊले पडताना दिसत नाहीत, असे सांगत अजित पवार म्हणाले शहरातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. खून, मारामा-या अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. भाजपकडे बहुमत असूनही विकासकामे होत नाहीत, हे शहरवासियांचे दुर्दैव आहे. भाजपचा पालिकेतील सहा महिन्यांचा कारभार 'फेल' झाला असून शहराची दूरावस्था झाली आहे, असा हल्लाबोल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात भूमिपुजने झालेल्या विकासकामांच्या सद्यस्थितीचा आढावा आज (शुक्रवारी) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. तब्बल दोन तास त्यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक, नगरसेविका आणि अधिका-यांसोबत बैठक घेऊन सद्यस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर व नगरसेविका मंगला कदम, डॉ. वैशाली घोडेकर, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, अजित गव्हाणे, दत्ता साने उपस्थित आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात कच-याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. आरोग्याचा प्रश्न बिकट झाला आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून शहराचा विकासाचा आलेख मंदावला आहे. शहराकडे कोणाचे लक्षच राहिले नाही. पालकमंत्र्यांचे शहराकडे दुर्लक्ष आहे. सत्ताधा-यांमध्ये ताळमेळ नाही. कोणाचे-कोणावर नियंत्रण राहिले नाही. तसेच विकास कामाला राष्ट्रवादीचा संपूर्ण पाठिंबा असेल आणि चुकीच्या कामाला राष्ट्रवादी प्रखर विरोध करणार आहे, असेही ते म्हणाले.. दिवसाढवळ्या लहान मुलांचे अपहरण होत आहे. त्यातच शहरातील अनेक ठिकाणचे 'सीसीटीव्ही' कॅमेरे बंद आहेत. पालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे त्वरीत दुरुस्त केले पाहिजेत.
पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यातच निगडीपर्यंत होणे गरजेचे आहे. नागपूरची मेट्रो सुरू झाली असून पुण्यात मात्र खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. काम वेगात होण्यासाठी सत्ताधा-यांची राजकीय इच्छाशक्ती कमी पडत आहे. शहरातील बीआरटीएसचे प्रलंबित मार्ग लवकर सुरू केले पाहिजेत. शहराच्या विविध भागात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. प्रशासनाने यावर लक्ष दिले पाहिजे. शास्तीकर माफीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रधानमंत्री आवाज योजनेचे काम गतीने करून वेळेत पूर्ण केले पाहिजे. शहराच्या विकास आराखड्याला 20 वर्ष झाली आहेत. त्यामुळे नवीन विकास आराखडा करण्याची गरज आहे.
अजित पवार म्हणाले की, जगात कुठेही एवढे पेट्रोल, डिझेल महाग नाही तेवढे महाराष्ट्रत आहे. महागाई गगनला भिडली आहे. 100 दिवसात महागाई कमी करण्याचे भाजपने आश्वासन दिले होते. मात्र, 1000 हून अधिक दिवस उलटून गेले तरी महागाई कमी झाली नाही. नोटाबंदी फेल झाली आहे. जीएसटीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. देशाचा विकासदर घटला आहे. रोजगार बंद होत चालले आहेत. सरकारच्या नाकर्तेपणाबाबत आता भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनाच बोलले पाहिजे, असे वाटू लागले असून ते बोलू लागले आहेत.
भाजपसोबत असलेले घटकपक्ष देखील भाजपच्या कारभारावर नाराज आहेत. राजू शेट्टी तर सरकारमधून बाहेर पडले. आरक्षणाला हात लावल्यावर भाजप सरकाराला सत्तेवरून खाली खेचू असे रामदास आठवले म्हणतात. महादेव जानकर तर मंत्री झाल्यावर धनगर समाजाला विसरूनच गेले आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत अवाक्षर देखील काढत नाहीत, असेही पवार म्हणाले. भाजपकडून शेतक-यांची फसवणूक केली जात आहे. कर्जमाफीसाठी वेळकाढूपणाची भूमिका घेतली जात आहे. शेतक-यांना बोगस म्हणत. बळीराजाची खिल्ली उडविली जात असून त्यांना बदनाम केले जात आहे.
पिंपरी पालिकेच्या वतीने निगडीत भक्ती-शक्ती शिल्पसमूह उद्यानालगत 107 मीटर उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात येणार आहे. त्याच्या कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादीच्या काळात झाले होते. या कामाची सद्यस्थिती तसेच पिंपरीतील जिजामाता रुग्णालय, भोसरी, चिंचवड येथील रुग्णालयाच्या कामाची सद्यस्थिती, भामा-आसखेड, पवना बंद जलवाहिनी प्रकल्प, सामाविष्ट गावातील रस्ते, आरक्षणे, रस्त्यांचे रुंदीकरण, बीआरटीएस प्रकल्प, तळवडे येथील 'डिअर' पार्क, चिखलीतील प्रस्तावित संतपीठ, जेएनएनयूआरएम अंतर्गत असलेली प्रलंबित कामे, शहरातील अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, डेअरी फार्म येथील उड्डाणपूल, दिघीमार्गावरील संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर समूहशिल्प, बोपखेलला जोडणारा पूल अशा विविध कामांचा पवार यांनी आढावा घेतला.