रेल्वे दुर्घटनेनंतर स्थानिक रहिवाशांसह प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रिया
मुंबई, २९ सप्टेंबर : परळ-एल्फिन्स्टन स्थानकादरम्यान झालेल्या दुर्घटनेनंतर स्थानिक रहिवाशी, प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मुंबई व उपनगरातून मिळून रेल्वे मंत्रालयाला सर्वाधिक महसूल मिळत असतानाही मुंबईला हव्या असणा-या सुविधा अद्याप पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत. मुंबईत दररोज उशिराने धावणा-या रेल्वेगाड्या, त्यामुळे होणारी गर्दी यामुळे अत्यंत वाईट स्थितीत प्रवास करावा लागतो, अशी प्रतिक्रिया रूपेश राणे या प्रवाशाने व्यक्त केली.या पुलावर दररोज सकाळ व सायंकाळच्या वेळात मोठ्या प्रमाणावर गर्दी होतच असते. हे आमच्यासाठी रोजचेच झाले आहे. मात्र आज सकाळी अचानक आरडाओरड झाली म्हणून पुलाशेजारील चाळीत रहाणारे रहिवाशी पहायला आलो. तर पुलावर ढकलाढकली, चेंगराचेंगरी, पळापळ असे चित्र होते. त्यात अनेक जण अक्षरश: पायाखाली तुडवलेलेही आम्ही पाहिले. हे चित्र अत्यंत ह्दयद्रावक होते. त्यात अनेकांचे निष्पाप जीव गेले. ही फारच दुर्दैवी घटना होती, अशी प्रतिक्रिया विमल गायकवाड या महिला रहिवाशांनी व्यक्त केली.
मुंबईत दिवसेंदिवस वाढत असलेले लोंढे आणि त्या अनुषंगाने अपु-या सुविधा व सुरक्षा यंत्रणा यामुळे आजची ही दुर्दैवी घटना घडली. नाईलाजास्तव आम्हाला प्रवास करावा लागतो. कोणतेही सरकार येवो, परंतू मुंबईकर प्रवाशांना कोणीही वाली नाही. गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसातही प्रवाशांचे अतोनात हाल झाले. अनेकांचे जीव गेले. मात्र तरीही प्रशासन व रेल्वे मंत्रालयाला जाग आलेली नाही, अशी प्रतिक्रियाही काही जणांनी व्यक्त केल्या.
दुर्घटना घडली तेव्हा कोणीही पोलीस, प्रशासकीय यंत्रणा रेल्वेचे अधिकारी मदतीला नव्हते. आजूबाजूच्या चाळीतील रहिवासी व येणारे-जाणारे प्रवासी यांनीच तातडीने मदत केली. नाही तर आणखी जीव गेले असते. साधारणत: तासाभराने पोलीस व वैद्यकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या. तोपर्यंत भर पावसात आम्हीच मदत केली असल्याचेही काही जणांनी सांगितले.