Breaking News

खाजगी सावकारीद्वारे गोळेवाडीच्या जमिनीचे दस्त, दोघांविरोधात गुन्हा

सातारा, २९ सप्टेंबर,  : मोटारसायकलच्या अपघातात जखमी झालेल्या मुलाच्या उपचाराचे दवाखान्यातील बील भरण्यासाठी सावकारी व्याजाने घेतलेल्या रकमेची व्याजासह परतफेड करुन देखील जमिनीचे करुन घेतलेले दस्त पलटवून न दिल्याने सातारच्या प्रतापसिंहनगर येथील प्रदीप दत्तात्रय जाधव व संजय दत्तात्रय कुलकर्णी यांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गोळेवाडीचे माजी सरपंच पांडुरंग विनायक घोरपडे यांनी फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून अधिक माहिती अशी, की पांडुरंग घोरपडे यांची गोळेवाडी येथे शेतजमीन असून, त्यांनी गावचे सरपंचपद भूषविले आहे. त्यांना दोन मुले असून, कुटुंबियांसह ते गावीच राहतात. त्यांचा धाकटा मुलगा प्रणय हा सातार्‍यातील एका प्रतिथयश अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असून, काही दिवसांपूर्वी त्याच्या मोटारसायकलचा अपघात झाला होता. या अपघातात जखमी झालेल्या प्रणय याच्यावर साता-यातील एका दवाखान्यात उपचार करण्यात आले. दवाखान्याचे साधारणत: 50 हजार रुपयांचे बील झाले होते. दवाखान्याचे बील भरण्यासाठी पैसे नसल्याने घोरपडे हे चिंतेत होते, त्याचवेळी नेमकी त्यांची संजय कुलकर्णी यांच्याशी भेट झाली. घोरपडे यांनी पैशांची गरज असल्याचे सांगताच, कुलकर्णी याने सातारच्या प्रतापसिंहनगरमधील प्रदीप दत्तात्रय जाधव हा व्याजाने पैसे देतो, असे सांगितले. घोरपडे यांनी त्याच्याकडून पैसे मिळवून देण्याची गळ कुलकर्णी याला घातली. त्याप्रमाणे जाधव हा कोरेगावात आला व त्याने घोरपडे यांची भेट घेतली. दोघांमध्ये सविस्तर चर्चा होऊन दरमहा 15 टक्के व्याजदराने 50 हजार रुपये देण्यास जाधव हा तयार झाला. त्याप्रमाणे घोरपडे यांनी रक्कम स्वीकारली व सुरक्षितता म्हणून स्व:मालकीची 20 गुंठे जमीन संजय दत्तात्रय कुलकर्णी यास गहाणखताने दिली. गहाणखत हे अडीच लाख रुपयांचे करण्यात आले, त्यावर घोरपडे यांनी विचारणा केल्यावर तुम्ही जर व्याजाची रक्कम न दिल्यास, सुरक्षा असावी म्हणून रक्कम वाढविली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यानच्या काळात घोरपडे यांनी जसे जमेल तसे व्याजापोटी रक्कम जमा केली, मात्र जाधव व कुलकर्णी हे व्याजाची रक्कम तुमच्याकडे फिरते आहे, ती द्या, असा वारंवार तगादा लावला. सरतेशेवटी घोरपडे यांनी आपल्या मित्रपरिवाराकडून रक्कम घेऊन दोघांना अदा केली आणि गहाण खताचा दस्त पलटवून देण्याची मागणी केली. त्यावर अजून 75 हजार रुपये येणे असल्याचे सांगून जाधव याने घोरपडे यांच्या मुलाला व कुटुंबियांना शिवीगाळ, दमदाटी केल्याने त्यांनी कुलकर्णी याच्या नावे असलेला गहाणखताचा दस्त जाधव याच्या नावे फिरवला व त्यात दहा गुंठे जादा क्षेत्र दिले. घोरपडे यांनी कर्जाऊ घेतलेल्या 50 हजार रुपये रकमेचे सव्याज 1 लाख 90 हजार रुपये परत करुन देखील प्रदीप जाधव हा त्यांना जमिनीचा दस्त पलटवून देण्यास तयार नव्हता, 16 लाख रुपये घेऊन ये, मगच दस्त पलटवून देतो, असे तो धमकावत होता. आजअखेर व्याजासह 1 लाख 90 हजार रुपये देऊन देखील जमिनीचा दस्त पलटवून देत नसल्याने पांडुरंग घोरपडे यांनी बुधवारी रात्री कोरेगाव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणी प्रदीप दत्तात्रय जाधव व संजय दत्तात्रय कुलकर्णी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार विजय जाधव तपास करत आहेत.