Breaking News

नाशिकमध्ये उपचाराअभावी आणखी एका नवजात अर्भकाचा मृत्यु

नाशिक, दि. 27, सप्टेंबर - नाशिकचे जिल्हा शासकीय रुग्णालयात नवजात बालमृत्यु प्रकरण उजेडात आल्यानंतर आज पुन्हा नवजात बालकाचा मृत्यु उपचार न  केल्याने झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दिव्यांग मातेने जन्म दिलेल्या बालकाचे वजन जन्मत:च कमी असल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या  सुमारास आणल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या नवजात बाल कक्षात दाखल न करून घेता तब्बल दोन तास ताटकळत बसवून ठेवल्याचा निर्दयी प्रकार घडला आहे.  त्यामुळे पहाटेच्या सुमारास त्या नवजात बालक दगावल्याने नातलगांनी रुग्णालयावर आरोप करीत संबंधित वैद्यकीय अधिकार्यांच्या निलंबनाची मागणी केली. 
हेमलता जगदीश कहांडोळे (23, रा. घनशेत, पो. कुळवंडी, ता. पेठ) ही मूकबधीर गर्भवतीने आज पहाटे दीड वाजेच्या सुमारास हरसुल रुग्णालयामध्ये पुरुष  जातीच्या बालकाला जन्म दिला. जन्मत: बालकाचे 1 किलो वजन असल्याने त्यांना तातडीने नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. पहाटे तीन  वाजेच्या सुमारास बाळंत महिला हेमलता, तिचे काका यशवंत जाधव, ताराबाई जाधव हे नातलग जिल्हा रुग्णालयात आले.
रात्रपाळीचे वैद्यकीय अधिकार्यांनी नवजात बालकांचा कक्ष (एन-एससीयु) याठिकाणी जागा नसल्याचे सांगत उपचाराला टाळाटाळ केली. त्यानंतर त्यांना दोन वेळा  पहिल्या मजल्यावरील एनएससीयु कक्षाकडे पाठविले मात्र त्याठिकाणी जागा नसल्याचे सांगत त्यांना पुन्हा खाली पिटाळण्यात आले. त्या नवजात बालकांवर उपचार  करण्याचीही तसदी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांनी घेतली नाही. त्यानंतर त्यांना मविप्रच्या आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात जाण्यास सांगण्यात आले.
यावेळी यशवंत जाधव यांनी मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालयात संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनीही जागा नसल्याचे न येण्यास सांगितले. या सार्या प्रकारात  दोन अडीच तासांचा कालावधी गेल्यानंतर पहाटे सहा वाजेच्या सुमारास त्यांना शताब्दी रुग्णालयात पाठविण्यात आले परंतु तिथे गेल्यानंतर बालकाला तपासले  असता मृत घोषित करण्यात आले. सुमारे तीन तास जिल्हा रुग्णालयाचे रात्रपाळीचे वैद्यकीय अधिकारी, एनएससीयु कक्षातील वैद्यकीय अधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळे  नवजात बालक दगावल्याचा आरोप नातलगांनी केला असून संबंधितांची चौकशी करून निलंबित करण्याची मागणी केली आहे.