Breaking News

सुनील शितपच्या जामीन अर्जावर सुनावणीस नकार

मुंबई, दि. 26, सप्टेंबर - घाटकोपर येथे झालेल्या इमारत दुर्घटनेतील मुख्य आरोपी सुनील शितप याच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यास मुंबई उच्च  न्यायालयाने नकार दिला. या अर्जावर आधी सत्र न्यायालयात सुनावणी होणे आवश्यक आहे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे शितप यांनी उच्च  न्यायालयात जामिनासाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे. न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठासमोर या संदर्भात सुनावणी झाली. या आधी सत्र न्यायालयात  शितपचा जामीन अर्ज एकदा फेटाळण्यात आला आहे. दरम्यान, पुरवणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर शितपकडे पुन्हा एकदा सत्र न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय  खुला आहे.
दरम्यान, इमारतीच्या मूळ बांधकामात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इमारत जुनी झाल्याने ती धोकादायक अवस्थेत होती. त्यामुळे शितपवर करण्यात  आलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असा युक्तिवाद शितपच्या वतीने करण्यात आला आहे.