Breaking News

संततधार पावसाने नवी मुंबईत जनजीवन विस्कळीत

नवी मुंबई, दि. 21, सप्टेंबर - संततधार पावसाने नवी मुंबईकरांचे जनजीवन आज विस्कळीत झाले होते. या पावसाचा परिणाम मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीवर  देखील झाला. काल राज्यात सर्वत्र पाऊस पडल्याने शेतकर्यांना शेतमाल काढता आला नाही. परिणामी आज केवळ 500 भाजीपाल्याच्या गाड्या बाजारात आल्या;  मात्र मुंबईत जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने जाहीर केल्याने 29 ऑगस्ट सारखी परिस्थिती होू नये म्हणून किरकोळ खरेदीदारांनी शेतमाल  खरेदीकडे बर्याच अंशी पाठ फिरविली होती. त्यामुळे विक्री अभावी भाजीपाला पडून राहिला व बाजार भाव देखील निम्म्यावर आले होते. काल दुपारपासून आज  सकाळी 8.30 वाजेपर्यंत शहरात सरासरी 275.70 मीमी इतकी पावसाची नोंद झाली. तर सकाळी 8.30 नंतर सायंकाळी 4 वाजेपर्यंत संततधार पाऊस पडत होता.  त्यामुळे बेलापूर - 49.0 मीमी, नेरुळ - 39.0 मीमी, वाशी - 54.5 मीमी, ऐरोली - 32.0 मीमी इतका पाऊस पडला, एकूण सरासरी - 43.62 मीमी  पावसाची नोंद झाली.दरम्यान काल दुपार पासून शहरात जोर धरलेल्या पावसाने सकाळी काही प्रमाणात जोर ओसरला असला, तरी संततधार पावसाची रिपरीप  चालूच होती. परिणामी आज दिवसभर शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. गणपती विसर्जनाच्या वेळी महापालिकेने रस्त्यांतील भरलेले खड्डे कालपासूनच्या  सततच्या पावसाने आज ठिकठिकाणी पुन्हा उघडे पडलेले पहावयास मिळाले. दरम्यान शासन आदेशानुसार आज शहरातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात  आली होती. कालपासून आज सायंकाळपर्यंत शहरात पावसामुळे कोणतीही गंभीर दुर्घटना घडली नसली, तरी कोपरखैरणे सेक्टर 19 प्लॉट न 372 मधील  सोसायटीच्या मीटर रूम मध्ये शॉर्टसर्किटने आग लागली होती. वाशी अग्निशमन दलाला फोन करूनही बंब वेळेत आला नसल्याने येथील नागरिकांनीच ती आग  विझविल्याची वेळ आली. आग विझविल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली. 9 ठिकाणी झाडे उमदळून  पडली, त्याच प्रमाणे जुईनगर सेक्टर 23 येथील सबवे , कोपरखैरणे स्टेशन सबवे, सीबीडी डेपो, सेक्टर 4 ते 6 नगरसेवक डॉ. जयाजी नाथ यांचा प्रभाग येथे पाणी  साङ्गल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तसेच वंडरपार्क जवळील नाला ओव्हर फ्लो झाला होता.