Breaking News

मुसळधार पावसामुळे विमानसेवा प्रभावित नागपुरात अडकले अनेक प्रवासी; झिम्बाब्वेच्या अंडर-19 टीमलाही फटका

मुंबई, दि. 21, सप्टेंबर - मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा विमान सेवांना जबरदस्त फटका बसला. मुंबई विमानतळावर लँडिंग न होऊ शकल्यामुळे एअर  इंडियाचे अनेक प्रवासी नागपूर विमानतळावर अडकून पडले होते. विशेष म्हणजे या प्रवाशांमध्ये झिम्बाब्वेच्या अंडर-19 क्रिकेट टीमच्या 22 सदस्यांचा देखील  समावेश होता.
मुंबईत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे विमानतळावर पाणी साचले होते. त्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली. तसेच अनेक विमानांना लँडिंगची परवानगी  नाकारण्यात आली. नागपुरातून मुंबईला जाणारी तीन विमानं परत पाठवण्यात आलीत. नागपूरहून 9 वाजून20 मिनीटांनी रवाना झालेले एअर इंडियाचे -ख 630 हे  विमान रात्री 11.30 वाजता परतले. या विमानाने प्रवास करणारे शेकडो प्रवासी नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकले होते.  विशेष म्हणजे एअर इंडिया किंवा विमानतळ प्राधिकरणाकडून या प्रवाशांना कुठलीही सुविधा पुरवण्यात आली नाही. त्यामुळे वयोवृद्ध आणि बालकांची खूप आबाळ  झाली. विमानतळावरील प्रसाधनगृह देखील बंद होती. नागपुरातील स्थानिक लोक आपापल्या घरी परतले. परंतु, परगावहून आलेल्या प्रवाशांना विमानतळावरच  अडकून बसावे लागले. यासंदर्भात एअर इंडियाच्या सूत्रांनी सांगितले की, दोन खासगी विमान कंपन्यांची उड्डाणे रद्द झाल्यामुळे त्यांनी नागपुरातील हॉटेल्स बुक करून  टाकली होती.
त्यामुळे एअर इंडियाला प्रवाशांची सोय करणे शक्य झाले नाही.
याच विमानाने झिम्बाब्वेच्या अंडर-19 क्रिकेट टीमचे 22 सदस्य मुंबईला गेले होते. परंतु, उड्डाण रद्द झाल्यामुळे त्यांनाही नागपुरात परतावे लागले. विमंतळापासून  जवळच असलेल्या एका हॉटेलच्या 4 खोल्यामध्ये या 22जणांना रात्र काढावी लागली. तर एअर इंडियाने प्रवास करणार्‍या उर्वरित 50 प्रवाशांना रात्रभर  विमानतळावर बसून रहावे लागले. विमानतळ प्राधिकरणामार्फत रहाण्याची सुविधा होऊ शकते काय, याबत प्रवाशांनी विचारले असता त्यावर एअरपोर्ट
ऑथॉरटीकडून काहीच उत्तर न मिळाल्याची तक्रार प्रवाशांनी केली. तर दुसरीकडे झिम्बाब्वेची अंडर-19 क्रिकेट टीम रात्री परतल्याचे विदर्भ क्रिकेट असोसिएशनला  माहितीच नव्हते. यासंदर्भात व्हीसीएचे यादव यांना संपर्क केला असता. झिम्बाब्वेच्या संघाने आमच्याशी काहीच संपर्क केला नसल्याचे यादव यांनी स्पष्ट केले.