Breaking News

नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत राष्ट्रवादीचे पोलीस आयुक्तांना निवेदन

नाशिक, दि. 16, सप्टेंबर - नाशिक शहरात सोनसाखळी चोरी व घरफोड्याच्या घटनेने चोरटे पुन्हा सक्रीय झाल्याने नाशिककर चिंतेत आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी  काँगेस पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र सिंगल यांना निवेदन दिले.
दि 14 रोजी पोलीसांची ठिकठिकाणी नाकेबंदी असतांनाही अवघ्या तासाभरात सहा महिलांच्या सोनसाखळ्या तोडून चोरटे पसार झाले. या सोनसाखळी चोरीने  उच्चांक गाठल्यामुळे शहरात गुन्हेगारीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
सोनसाखळी चोरी सोबतच शहरात घरफोडीच्या देखील घटनांमध्ये वाढ झाली आहे. शिवाय चोरीचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले आहे. अपुर्‍या पोलिस यंत्रणेमुळे  रोजच किरकोळ कारणावरून हाणामारी , चाकू हल्ला , नागरीकांची लुटमार , चोर्‍या, घरफोडी, खून इ. प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. लागोपाठ  खुनांचे प्रकार घडत असल्यामुळे शहरवासीयांमध्ये भितीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झालेले आहे. शहरात वाढत असलेल्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी  प्रभावी उपाययोजना राबविण्याची तसेच गुन्हेगारांना कडक शासन करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावर सोनसाखळी चोरी व घरफोडीतील गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडण्यात येईल व कठोर कारवाई करणार असल्याचे आश्‍वासन पोलीस आयुक्त सिंगल यांनी  शिष्टमंडळास दिले.