Breaking News

भूमीगत वीज वाहिनींसाठी शहरात 38 कोटीची तर जिल्ह्यात 137 कोटीची कामे करणार : चंद्रशेखर बावनकुळे

धुळे, दि. 16, सप्टेंबर - उघड्यावरील वीज वाहिन्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासह वीज गळती रोखण्यासाठी शहरात भूमीगत वीज वाहिन्यांसाठी 38 कोटींची तर  जिल्ह्यात 137 कोटींची कामे मार्च-2018 अखेर पुर्ण करण्यात येतील असे आश्‍वासन राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
शहरातील छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहात आयोजीत महावितरणाच्या जनता दरबारात जिल्ह्यातील लोकप्रतिनीधी व नागरिकांनी मांडलेल्या समस्याला उत्तर देतांना  श्री.बावनकुळे बोलत होते. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, राज्याचे  रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, महापौर कल्पना महाले, खासदार डॉ. हीना गावित, आमदार अनिल अण्णा गोटे, आमदार डी. एस. अहिरे,  महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया, जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर, अधिक्षक अभियंता (पायाभूत आराखडा)  मा.श्री.अशोक साळुंखे, अधिक्षक अभियंता मा.श्री.प्रकाश पौणीकर, श्री. चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ऊर्जा मंत्री श्री.बावनकुळे म्हणाले की, राज्यातील वीज संकटाला तोंड देण्यासाठी वर्षभरात किमान 1 हजार मेगावॅट इतक्या वीज बचतीची गरज  असून ‘विजेची बचत हीच विजेची निर्मीती’ ह्या उक्तीप्रमाणे प्रत्येक नागरिकाने वीज बचतीमध्ये सहयोग देऊन राष्ट्रीय कार्यास हातभार लावावा असे आवाहन त्यांनी  यावेळी केले. शासनामार्फत सर्वसामान्य जनतेसाठी विविध उपक्रम राबवित असतांना त्यांच्या प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी जनता दरबार / संवाद साधून प्रत्येक  शाखा अभियंता, उपअभियंता व कार्यकारी अभियंत्याने जनतेच्या दारात जाऊन दर महिन्याला एक ग्राहक मेळावा घेऊन जनतेच्या तक्रारी सोडविण्याचे निर्देशही  त्यांनी यावेळी महावितरणाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना दिले.
जनतेचे गार्‍हाणे ऐकूण घेतांना नागरिक श्री.अशोक चौधरी यांच्या प्रश्‍नाला उत्तर देतांना ऊर्जा मंत्री श्री.बावनकुळें म्हणाले की, सार्वजानिक उपक्रमाच्या अनुषंगाने  वसाहतींमध्ये पथदिव्यांसाठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत तरतूद उपलब्ध असून त्या माध्यमातून प्रस्ताव तयार करुन सादर करण्याचे निर्देश सर्व शाखा  अभियंत्यांना दिले. शेतकरी श्री.संतोष पाटील यांच्या शेतीपंपासाठी किमान सहा तास विजेची मागणीच्या प्रश्‍नाला उत्तर देतांना मंत्री श्री.बावनकुळे म्हणाले की, सोलर  पंप हा याला उत्तम पर्याय आहे, सोलर पंपासाठी शासनाने योजना तयार केली असून भारनियमनाबाबत आढावा घेऊन यावर तोडगा काढण्यात येईल. शहरातील  रस्त्यांवर व वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे पोल व ट्रान्सफार्मर बाबत श्री.संदीप पाटोळे यांनी मांडलेल्या गार्‍हाण्याला उत्तर देतांना ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी  संपुर्ण जिल्ह्यातील क्सीडेंट स्पॉट सर्व्हे करुन त्याचा तीन महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या.
अशा प्रकारच्या विविध समस्यांचे निराकरण त्याच ठिकाणी करण्यात आले तर काही दिर्घकालीन समस्या ह्या तीन महिन्याच्या आत निकाली काढण्याचे निर्देश देत  कर्तव्यात कसुर करणार्‍या तीन अभियंत्यांवर निलंबनाची तर एका अभियंत्याची विभागाबाहेर बदली प्रस्तावीत करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.